मोदींनी महाराष्ट्रात सभा घेतल्या तिथं महायुतीचं काय झालं? एकट्या भाजपच्या 10 जणांचा पराभव, इतरांचे काय
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
महाराष्ट्रातही मोदींच्या तब्बल 16 सभा झाल्या. यात त्यांनी 25 पेक्षा जास्त उमेदवारांचा प्रचार केला. मोदींच्या सभांच्या तुलनेत भाजप आणि महायुतीला मिळालेलं यश मात्र खूपच कमी आहे.
मुंबई : लोकसभा निवडणुकीत ४०० पारचा नारा देणाऱ्या भाजपला मोठा फटका बसला. २०१९ च्या तुलनेत भाजपच्या ६० पेक्षा जास्त जागा देशभरात कमी झाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभांचा धडाकाच लावला होता. महाराष्ट्रातही मोदींच्या तब्बल 16 सभा झाल्या. यात त्यांनी २५ उमेदवारांचा प्रचार केला. मोदींच्या सभांच्या तुलनेत भाजप आणि महायुतीला मिळालेलं यश मात्र खूपच कमी आहे. मुंबईत दोन तर पुणे, मावळ आणि साताऱ्यात महायुतीला यश मिळालं. उर्वरित ठिकाणी महायुतीच्या पदरी पराभव पडला. मोदींनी सभा घेतलेल्या १० भाजप उमेदवारांचा पराभव झाला.
चंद्रपूर - चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी पंतप्रधान मोदींनी सभा घेतली होती. मात्र इथं काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांनी दणदणीत विजय मिळवला. काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांनी तब्बल २ लाख ६० हजार ४०६ मतांनी विजय मिळवला.
रामटेक - रामटेकमध्ये काँग्रेसचे उमेदवार श्यामकुमार बर्वे यांनी ७६ हजार ७६८ मतांनी विजय मिळवला. बर्वे यांना ६ लाख १३ हजार २५ मते मिळाली. तर पराभूत झालेल्या शिवसेनेच्या राजू पारवे यांना ५ लाख ३६ हजार २५७ मते मिळाली.
advertisement
वर्धा - वर्ध्यात भाजपचे उमेदवार रामदास तडस यांच्यासाठी मोदींनी सभा घेतली होती. मात्र इथं काँग्रेसचे उमेदवार अमर काळे यांनी ८१ हजार मतांनी विजय मिळवला.
नांदेड - नांदेडमध्ये काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी भाजप प्रवेश केल्यानंतरही लोकसभेला भाजपला नांदेडमध्ये मोठा धक्का बसला. भाजपचे प्रतापराव चिखलीकर यांना काँग्रेसच्या वसंत चव्हाण यांनी ५९ हजार मताधिक्क्याने हरवलं.
advertisement
परभणी - परभणीत महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडे ही जागा होती. मात्र ही जागा महायुतीने रासपचे महादेव जानकर यांच्यासाठी सोडली. इथेही पंतप्रधान मोदींनी सभा घेतली. पण शिवसेना ठाकरे गटाच्या संजय जाधव यांनी १ लाख ३४ हजारांच्या मताधिक्क्याने महादेव जानकर यांच्यावर विजय मिळवला
advertisement
कोल्हापूर -शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांच्यासाठी पंतप्रधान मोदींनी सभा घेतली होती. मात्र इथं मविआकडून काँग्रेस उमेदवार छत्रपती शाहू महाराजांनी मोठा विजय मिळवला. शाहू महाराजांनी १ लाख ५४ हजारांनी संजय मंडलिक यांचा पराभव केला.
कराड - साताऱ्याचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्यासाठी पंतप्रधान मोदींनी कराडमध्ये सभा घेतली होती. इथं उदयनराजेंना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे यांचं आव्हान होतं. उदयनराजेंनी शशिकांत शिंदेंचा ३२ हजार मतांनी पराभव केला.
advertisement
सोलापूर - सोलापूरमध्ये भाजपने राम सातपुतेंना उमेदवारी दिली होती. राम सातपुतेंसाठी मोदींनी सभा घेतली, मात्र काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी सातपुतेंचा पराभव केला. प्रणिती शिंदे यांनी ७४ हजार मतांनी सोलापूरमध्ये विजय मिळवला.
पुणे - पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार उमेदवारांसाठी सभा घेतली. यात पुण्यात मुरलीधर मोहोळ आणि मावळमध्ये श्रीरंग बारणे यांचा विजय झाला. तर शिरूरमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील आणि बारामतीत सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला.
advertisement
माढा - माळशिरसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माढ्याचे भाजप उमेदवार रणजित सिंह नाइक निंबाळकर यांच्यासाठी सभा घेतली होती. पण याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शऱद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील यांनी विजय मिळवला.
धाराशिव -राष्ट्रवादीच्या अर्चना पाटील यांच्यासाठी मोदींनी सभा घेतली होती. पण शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी तब्बल ३ लाख २९ हजार मताधिक्क्याने विजय मिळवला.
advertisement
लातूर - लातूरमध्ये भाजपचे उमेदवार सुधाकर श्रृंगारे हे मैदानात होते. त्यांचा काँग्रेस उमेदवार शिवाजी काळगे यांनी पराभव केला. शिवाजी काळगे यांनी ६१ हजार मतांनी विजय मिळवला.
बीड - भाजपला बीडमध्ये मोठा धक्का बसला. यावेळी प्रीतम मुंडे यांच्याऐवजी पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी विजय मिळवत पंकजा मुंडेंना पराभवाचा धक्का दिला.
कल्याण - कल्याणमध्ये पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्यासाठी सभा घेतली होती. श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांचा सहज पराभव केला.
अहमदनगर - अहमदनगरमध्ये सुजय विखे पाटील यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली. पण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे निलेश लंके अहमदनगरमध्ये जायंट किलर ठरले. त्यांनी सुजय विखे पाटील यांचा पराभव केला.
दिंडोरी - दिंडोरीत केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांच्यासाठी मोदींनी सभा घेतली होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या भास्कर भगरे यांनी भारती पवार यांचा १ लाख १३ हजार मतांनी पराभव केला.
मुंबई - मुंबईतल्या सहा जागांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिवाजी पार्कवर सभा झाली होती. याशिवाय रोड शोसुद्धा झाला होता. या सभेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे हेसुद्धा होते. मात्र तरीही मुंबईत महायुतीला केवळ दोन जागा जिंकता आल्या. मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी विजय मिळवला. तर मुंबई उत्तर पश्चिममध्ये शिवसेनेचे रविंद्र वायकर हे फक्त ४८ मतांनी जिंकले. इतर चार जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 05, 2024 8:30 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मोदींनी महाराष्ट्रात सभा घेतल्या तिथं महायुतीचं काय झालं? एकट्या भाजपच्या 10 जणांचा पराभव, इतरांचे काय