ड्युटीवर जातो सांगून घराबाहेर पडला पोलीस अधिकारी, पत्नीसमोर आला मृतदेह
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
ऑनलाइन गेम मुळे कर्जबाजारी झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याचं धक्कादायक पाऊल, पत्नीला खोट सांगून घराबाहेर पडला आणि...
रवी सपाटे, प्रतिनिधी गोंदिया: ऑनलाईन गेम्सचा नाद खूप वाईट, तो लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत कुणालाही लागू शकतो. याच ऑनलाईन गेममुळे अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झाल्याच्या घटना आपण वाचत असतो. चक्क पोलीस कर्मचाऱ्याला या ऑनलाईन गेमिंगचा नाद लागला आणि सगळं वाटोळं झालं. कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.
राज्य राखीव पोलीस दलात काम करणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याला ऑनलाईन गेम्स खेळवण्याचं व्यसन लागलं. हे व्यसन इतकं भयानक होतं की त्यासाठी त्याने आपल्याकडचा सगळा पैसा लावला. या व्यसनामुळे कर्जात बुडालेल्या पोलीस कर्मचाऱ्याने बेवारटोला धरणाच्या पाण्यात उडी घेऊन आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला.
ज्ञानेश्वर भुरे वय वर्ष 36 असं आत्महत्या केलेल्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे. ज्ञानेश्वर भुरे ड्यूटीवर जातो असं पत्नीला सांगून घराबाहेर पडले, मात्र ड्युटीवर न जाता त्यांनी थेट आत्महत्या करण्याचा विचार केला आणि त्यासाठी ते धरणाजवळ आले.
advertisement
ड्युटी संपून बराच वेळ झाल्यानंतरही घरी न आल्याने पत्नी माधुरीने आपले सासरे भाऊराव भुरे यांना फोन करून ज्ञानेश्वर हे ड्यूटीवर गेले नाहीत आणि घरीही परतले नाहीत, असे सांगितले. ज्ञानेश्वर यांचा सर्वत्र शोध घेण्यात आला. मात्र पत्ता लागला नाही.
यावर पोलिस ठाण्यात ज्ञानेश्वर बेपत्ता असल्याची तक्रार माधुरीने दिली. तर सालेकसा तालुक्यातील बेवारटोला येथील धरणात त्याचा मृतदेह आढळला. याप्रकरणी सालेकसा पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे. या घटनेमुळे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
Location :
Gondiya,Maharashtra
First Published :
October 30, 2024 1:31 PM IST