Mumbai Rain: घरात कमरेपर्यंत पाणी, डोळ्यांदेखत संसाराची दैना, कळव्यातील नागरिकांचा प्रशासनावर संताप
- Published by:Vrushali Kedar
- Reported by:Bhavna Arvind Kamble
Last Updated:
Mumbai Rain: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबई आणि ठाण्यातील नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ठाण्यातील कळवा ईस्ट परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरलं आहे.
ठाणे: मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे कळवा पूर्व येथील 'जगन्नाथ काशिनाथ साळवी' तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. तलावलगतच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. संपूर्ण परिसरात कमरेपर्यंत पाणी साचलं आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे घरातील संसारोपयोगी वस्तू खराब झाल्या आहेत. रस्ते जलमय झाल्याने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी कोणताही पर्यायी मार्ग उपलब्ध नाही.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे वेळोवेळी मागणी करूनही अद्याप कोणतीही मदत किंवा उपाय योजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या परिसरामध्ये दरवर्षी अशीच परिस्थिती उद्भवते. प्रशासनाकडून कोणतीही कायमस्वरूपी सोय केली जात नाही. सध्याच्या कठीण प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सुरेश साळवी आणि त्यांचा स्वयंसेवक गट पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आला आहे. ते बोटीद्वारे लहान मुलांना, महिलांना, वृद्धांना आणि अडचणीत सापडलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवत आहेत.
advertisement
सुरेश साळवी म्हणाले, "मी गेल्या अनेक वर्षांपासून या भागात येतो. याठिकाणी दरवर्षी पावसाळ्यात कमरेपर्यंत पाणी भरते. स्थानिकांना खूप त्रास सहन करावा लागतो. मी आणि माझे सहकारी मदत करण्याचा प्रयत्न करतो."
तलावाजवळील परिसरात गणेश मूर्तींचा एक मोठा कारखाना आहे. हा कारखाना देखील पाण्याखाली गेल्याने गणपती बाप्पाच्या अनेक मूर्तींचं नुकसान झालं आहे. पाण्यामुळे मूर्ती भिजून खराब झाल्या असून, कारागिरांचं आर्थिक नुकसान झालं आहे. गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असताना झालेलं नुकसान हे मूर्तिकारांसाठी मोठा धक्का आहे.
advertisement
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला आवाहन केलं आहे की, त्वरीत मदत पाठवावी, पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा आणि दरवर्षी होणाऱ्या या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा. अन्यथा नागरिकांचा संयम सुटेल, अशी ताकीद देखील स्थानिकांनी दिली आहे. सध्या परिस्थिती गंभीर असून प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे.
view commentsLocation :
Thane,Maharashtra
First Published :
August 19, 2025 2:23 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Mumbai Rain: घरात कमरेपर्यंत पाणी, डोळ्यांदेखत संसाराची दैना, कळव्यातील नागरिकांचा प्रशासनावर संताप

