Sanjay Shirsat : संजय शिरसाटांच्या अडचणी संपता संपेना, ठाकरे गटानंतर आता भाजपनंही घेरलं, थेट तक्रार करत म्हणाले...
- Published by:Shrikant Bhosale
- Reported by:Tushar Rupanwar
Last Updated:
Sanjay Shirsat : ठाकरे गटाकडून शिरसाट यांच्यावर हल्लाबोल होत असताना आता मित्रपक्षाने देखील त्यांना घेरण्याची तयारी केली आहे. भाजपच्या आमदारांनी शिरसाट यांच्याविरोधात राज्य नेतृत्वाकडे तक्रारी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुंबई: शिवसेना ठाकरे गटाच्या रडारवर असलेले राज्याचे समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट यांच्या अडचणी संपता संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. ठाकरे गटाकडून शिरसाट यांच्यावर हल्लाबोल होत असताना आता मित्रपक्षाने देखील त्यांना घेरण्याची तयारी केली आहे. भाजपच्या आमदारांनी शिरसाट यांच्याविरोधात राज्य नेतृत्वाकडे तक्रारी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मागील काही दिवसांपासून संजय शिरसाट हे विविध कारणांनी चर्चेत आले आहेत. आपल्या खात्याला निधी मिळत नसल्याचे सांगत त्यांनी अजित पवार यांच्याविरोधात जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्याशिवाय, शिरसाट यांच्या मुलासह त्यांच्यावरही विरोधकांकडून आरोप करण्यात आले होते.
मित्रपक्षही नाराज....
राज्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या कामकाजावर सध्या भाजपच्या आमदारांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. मंत्री संजय शिरसाट यांच्या नेतृत्वाखालील या विभागाची कार्यशैली आणि निर्णय प्रक्रियेतील विलंब यावर भाजपच्या काही आमदारांनी थेट राज्य नेतृत्वाकडे नाराजी नोंदवली आहे.
advertisement
सूत्रांच्या माहितीनुसार, सामाजिक न्याय विभागाची अनेक कामं नियोजित वेळेत पूर्ण होत नाहीत, तर काही कामे तर वारंवार सांगूनही रखडलेलीच राहतात. त्यामुळे शेकडो सामाजिक प्रकल्प, योजनांचे लाभार्थी आणि विविध वंचित घटक अडकले गेले असल्याचं आमदारांनी स्पष्ट केलं आहे.
भाजप नेतृत्वाला या विषयाची गांभीर्याने दखल घेण्यास भाग पाडलं जात असून, आगामी मंत्रिमंडळ फेरबदलाच्या पार्श्वभूमीवर शिरसाट यांच्या कामगिरीचा पुनर्विचार होण्याची शक्यता आहे.
advertisement
व्हिडीओमुळे शिरसाट अडचणीत...
काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आरोप केला होते. त्यानंतर संजय शिरसाट यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. यामध्ये एक पैशांनी भरलेली बॅग दिसून आली. या व्हिडीओत बॅगेत पैसे नसून कपडे असल्याचा दावा शिरसाट यांनी केला होता. त्याआधी शिरसाट यांच्या मुलावर वेगवेगळे आरोप झाले होते. एका हॉटेलच्या खरेदी-विक्रीवरून विरोधकांनी शिरसाट यांना घेरलं होते. त्यानंतर संजय शिरसाट हे सातत्याने चर्चेत आले आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 16, 2025 12:55 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sanjay Shirsat : संजय शिरसाटांच्या अडचणी संपता संपेना, ठाकरे गटानंतर आता भाजपनंही घेरलं, थेट तक्रार करत म्हणाले...