जगभरात ज्याची हवा, तो 'कंदी पेढा' सातारच्या मोदींनी बनवला! 125 वर्षांची परंपरा
- Published by:Isha Jagtap
- local18
- Reported by:Shubham Sharad Bodake
Last Updated:
तुळजाराम मोदी यांनी काहीतरी वेगळं म्हणून सातारी कंदी पेढा बनवला. आज त्यांची चौथी पिढी हा पेढा बनवते. या पेढ्याला 100 ते 125 वर्षे पूर्ण झाली आहेत.
शुभम बोडके, प्रतिनिधी
सातारा : आपल्या भारतात प्रत्येक शहराची एक विशिष्ट ओळख आहे. विविध ठिकाणचे पदार्थ जगप्रसिद्ध आहेत. जशी नाशिकची द्राक्ष, नागपूरची संत्री त्याचप्रमाणे सातारी कंदी पेढा म्हणजे अनेकजणांसाठी जीव की प्राण. सातारा जिल्हा हा ऐतिहासिक जिल्हा म्हणून संपूर्ण जगभरात ओळखला जातो. परंतु सातारा आणि कंदी पेढ्याचं समीकरण काही औरच आहे.
हा कंदी पेढा नेमका कधी आणि कोणी सुरू केला, तो एवढा लोकप्रिय कसा झाला, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया. जगप्रसिद्ध मिठाईतज्ज्ञ तुळजाराम मोदी यांची चौथी पिढी असलेले अर्जुन मोदी यांनी याबाबत माहिती दिली आहे.
advertisement
तुळजाराम मोदी आणि बन्सीलाल मोदी हे 2 सख्खे भाऊ सातारी कंदी पेढ्याचे जनक आहेत. जवळपास 100 ते 125 वर्षांपूर्वी मोदी बंधूंनी कंदी पेढ्याचा शोध लावला. त्यांच्या घराण्याकडून तब्बल 160 वर्षांपूर्वीपासून मिठाई बनवण्याचं काम केलं जायचं. तुळजाराम मोदी यांनी मिठाईत नाविन्य आणण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी काहीतरी वेगळं म्हणून त्यांनी सातारी कंदी पेढा बनवला. आज त्यांची चौथी पिढीदेखील हा पेढा बनवते. म्हणजेच या पेढ्याला 100 ते 125 वर्षे पूर्ण झाली आहेत.
advertisement
रामफळीला जसा बाहेरून चॉकलेटी आणि आतून पांढरा रंग असतो, अगदी तशीच या पेढ्याची रचना असते. तो 100% गायी-म्हशीच्या दुधापासून बनवला जातो. गायी-म्हशींना पूर्वी डोंगराळ भागातील कंदमुळे खायला दिली जायची. त्यातून त्यांना भरपूर पोषक तत्त्व मिळायचे. त्यांचं दूध आटवल्यानंतर त्याचा रंग चॉकलेटी दिसू लागतो. याच दुधापासून कंदी पेढा बनवला जातो. त्यामुळे हा पेढा उपवासालादेखील चालतो. विशेष म्हणजे यात साखरेचं प्रमाण अत्यंत कमी असतं. त्यामुळे शुगर असलेले लोकसुद्धा हा पेढा आवडीनं खाऊ शकतात.
advertisement
या पेढ्याची पौष्टिकता एवढी असते की, तालीम करणारेसुद्धा दुधात 2 कंदीपेढ्यांचा चुरा घालून पितात. हे नॅचरल प्रोटीन मानलं जातं, असं अर्जुन मोदी यांनी सांगितलं. दरम्यान, सव्वाशे वर्षांपूर्वीच सातारी कंदी पेढा बनवल्यानंतर तुळजाराम मोदी यांना जगप्रसिद्ध मिठाई शास्त्रज्ज्ञ हा किताब देण्यात आला होता. याचं कारण म्हणजे हा पेढा भारतासह अनेक देशांमध्ये खाल्ला जायचा, त्यामुळे त्याला मोठी मागणी होती. यूएसए, जर्मनी, जपान, इंग्लंड, इत्यादी अनेक देशांमध्ये हा पेढा एक्स्पोर्ट केला जात होता. अगदी वर्ल्ड वॉर 2 मध्येसुद्धा इंडियन फोर्सेसना हा पेढा खायला दिला जात असे, असं अर्जुन मोदी यांनी सांगितलं.
view commentsLocation :
Satara,Maharashtra
First Published :
July 15, 2024 8:28 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
जगभरात ज्याची हवा, तो 'कंदी पेढा' सातारच्या मोदींनी बनवला! 125 वर्षांची परंपरा

