अतिवृष्टी झाली, आता सगळं संपलंय.. ५ हजार शेतकऱ्यांचे फोन, तुम्हीही कराल 'शिवार'ला सॅल्यूट...!
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या हा राज्य सरकारसमोर सर्वांत मोठा प्रश्न आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना आळा घालण्यासाठी शिवारने महत्त्वाचे काम केले आहे.
मुंबई : मराठवाड्यावर अतिवृष्टीरुपी संकट कोसळलेले असताना ५ हजार शेतकऱ्यांच्या मनात आता सगळे संपलेय, जीव देण्याशिवाय पर्याय नाही, असे विचार घोंघावत होते. त्याचवेळी मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी त्यांनी शिवारला फोन केले. शिवारच्या स्वयंसेवकांनी शेतकऱ्यांना धीर देऊन त्यांच्या मनातला विचार बाजूला सारण्यात यश मिळवले. शिवारच्या मानवतावादी पावलाचे कौतुक होत आहे.
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना आळा घालण्यासाठी आणि त्यांना मानसिक आधार देण्यासाठी शिवार फाऊंडेशनकडून सुरू करण्यात आलेली ‘शिवार हेल्पलाईन’ शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरत आहे. या हेल्पलाईनवर केवळ दोन आठवड्यांच्या कालावधीत म्हणजे २४ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबरदरम्यान — राज्यभरातील तब्बल ५,४४६ शेतकऱ्यांनी संपर्क साधला.
या काळात एकूण २६ जिल्ह्यांमधून फोन आले, ज्यात नांदेड जिल्हा सर्वाधिक ७८९ फोनसह पहिल्या क्रमांकावर राहिला. त्यानंतर उस्मानाबाद (धाराशीव) येथून ६९३, सोलापूरहून ६७५, आणि बीड जिल्ह्यातून ४९३ फोन आले. औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) येथून ३४८ कॉल्स प्राप्त झाले. लातूर, अहमदनगर, परभणी, नागपूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, हिंगोली, वाशिम, जळगाव, जालना, नाशिक, पुणे, सांगली, सातारा, अहिल्यनगर आणि भंडारा यांसारख्या जिल्ह्यांमधूनही शेतकऱ्यांनी या हेल्पलाईनवर संपर्क साधला.
advertisement
सर्वाधिक फोन मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमधून आल्याचे दिसून आले. या भागांतील शेतकरी आर्थिक संकट, दुष्काळ, पिकांचे नुकसान आणि कर्जबाजारीपणामुळे मानसिक तणावात आहेत. या पार्श्वभूमीवर शिवार हेल्पलाईन” शेतकऱ्यांसाठी मानसिक आधार आणि समुपदेशनाचं माध्यम ठरत आहे.
वयोगटानुसार कॉल्सचे विश्लेषण
हेल्पलाईनवरील आकडेवारीनुसार, ३० ते ४० वयोगटातील शेतकरी सर्वाधिक तणावग्रस्त असल्याचे दिसले आहे. या गटातून १६९६ कॉल्स प्राप्त झाले. ४० ते ५० वयोगटातील १४८७, आणि ५० वर्षांवरील ११३७ शेतकऱ्यांनी देखील मदतीसाठी कॉल केला. तर २० ते ३० वर्षे वयोगटातील १०५६, आणि १६ ते २० वर्षे वयोगटातील ७० तरुण शेतकऱ्यांनीही या हेल्पलाईनचा आधार घेतला. यावरून तरुण आणि मध्यमवयीन शेतकरी हे तणावाच्या गर्तेत अधिक सापडत असल्याचे स्पष्ट होते.
advertisement
पुरुषांपेक्षा महिलांचे कॉल कमी
लिंगानुसार पाहिल्यास, पुरुष शेतकऱ्यांकडून तब्बल ४,६३९ कॉल्स आले, तर महिला शेतकरी फक्त ८०८ या प्रमाणात हेल्पलाईनशी जोडल्या गेल्या. तज्ज्ञांच्या मते, महिलांमध्ये मानसिक तणाव असला तरी घराच्या काळजीने त्या टोकाचे पाऊल उचलत नाहीत.
कोणत्या दिवशी आणि वेळी जास्त कॉल्स आले?
२४ ते २९ सप्टेंबर या काळात सर्वाधिक २,६४५ कॉल्स प्राप्त झाले. कॉल्सच्या वेळेनुसार पाहता, दुपारी १२ ते संध्याकाळी ६ या वेळेत सर्वाधिक १,९५६ फोन आले, तर सकाळी ७ ते १२ दरम्यान १,०८४ कॉल्स, संध्याकाळी ६ ते मध्यरात्री १२ दरम्यान १,८६४ कॉल्स, आणि मध्यरात्री १२ ते सकाळी ७ दरम्यान ५४२ कॉल्स आले. यावरून दिसून येते की, शेतकरी बहुतेक वेळा दिवसाच्या कामानंतर मानसिक आधारासाठी संपर्क साधत आहेत.
advertisement
हेल्पलाईनचा उद्देश
या हेल्पलाईनचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना आत्महत्येपासून रोखणे आणि त्यांना मानसिक आधार देणे. मानसिक तणाव, पिकांचे नुकसान, कर्जाचा भार आणि कुटुंबीयांचा ताण — या सगळ्यांच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना या माध्यमातून तज्ज्ञ समुपदेशकांशी संवाद साधण्याची संधी मिळते. या कॉल्समधून आलेल्या समस्यांचे वर्गीकरण करून प्रशासन तातडीने मानसिक आरोग्य सेवा, कर्ज पुनर्गठन, शेतीसाठी सहाय्य योजना अशा उपाययोजनांशी शेतकऱ्यांना जोडत आहे.
advertisement
राज्यासाठी दिलासा देणारी बाब
view commentsशिवार हेल्पलाईन हा उपक्रम शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना आळा घालण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण आणि मानवतावादी पाऊल ठरत आहे. यामुळे मानसोपचारतज्ज्ञ आणि स्वयंसेवी संस्था या सर्वांचा सहभाग असलेली एक एकात्मिक मदतव्यवस्था निर्माण झाली आहे, जी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मनातील काळोखात एक आशेचा दिवा पेटवत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 10, 2025 9:40 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अतिवृष्टी झाली, आता सगळं संपलंय.. ५ हजार शेतकऱ्यांचे फोन, तुम्हीही कराल 'शिवार'ला सॅल्यूट...!