सोलापुरात 'ऑपरेशन लोटस', शरद पवारांचे निष्ठावंत नेते गळाला, बबनदादा शिंदेंसह 2 माजी आमदार जाणार भाजपात
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाला मोठा धक्का बसणार असून, पक्षाचे निष्ठावान मानले जाणारे माजी आमदार बबनदादा शिंदेंसह दोन माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
सोलापूर: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाला सोलापूर जिल्ह्यात जोरदार धक्का बसणार असून, पक्षाचे निष्ठावान मानले जाणारे माजी आमदार बबनदादा शिंदे हे आपल्या दोन्ही मुलांसह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्यासोबतच माजी आमदार राजन पाटील आणि दिलीप माने हे देखील भाजपमध्ये सामील होणार असल्याने राष्ट्रवादीच्या गोटात मोठी अस्वस्थता पसरली आहे.
या नेत्यांच्या भाजप प्रवेशामुळे सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठे खिंडार पडणार आहे. विशेषतः शरद पवार गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. भाजपच्या 'ऑपरेशन लोटस'मुळे आगामी निवडणुकीत शरद पवार गट बॅकफुटला जाताना दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा पक्ष प्रवेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लवकरच होणार आहे. या प्रवेशासाठी भाजपमधील स्थानिक नेतृत्वाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि पहिल्यांदाच आमदार झालेले देवेंद्र कोटे यांची भूमिका या सर्व घडामोडींमध्ये निर्णायक ठरली असल्याचे सांगितले जाते. या नेत्यांनी केलेल्या यशस्वी प्रयत्नांमुळे राष्ट्रवादीतील प्रभावी नेत्यांना भाजपमध्ये आणण्यात यश आल्याचं बोललं जात आहे.
advertisement
बबनदादा शिंदे, राजन पाटील आणि दिलीप माने यांच्यासारखे दिग्गज नेते भाजपमध्ये गेल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे. या नेत्यांचा त्यांच्या मतदारसंघात असलेला प्रभाव पाहता, भाजपला जिल्ह्याच्या राजकारणात मोठी ताकद मिळणार आहे, तर राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी ही मोठी चिंतेची बाब आहे.
view commentsLocation :
Solapur,Maharashtra
First Published :
October 17, 2025 6:54 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सोलापुरात 'ऑपरेशन लोटस', शरद पवारांचे निष्ठावंत नेते गळाला, बबनदादा शिंदेंसह 2 माजी आमदार जाणार भाजपात