मुंबईत आपला महापौर व्हायला पाहिजे, देवाच्या मनात असेल तर... उद्धव ठाकरेंनी सस्पेन्स वाढवला!
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Uddhav Thackeray Mumbai Mayor: शिवसेनेचा महापौर बसेल एवढे संख्याबळ नाही, याचे दु:ख आहे. पण देवाच्या मनात असेल तर आपला महापौर बसेल, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी महापौरपदावरून सस्पेन्स वाढवला.
मुंबई : आपल्या मदतीशिवाय मुंबईत भाजपचा महापौर बसणार नाही, हे स्पष्ट झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने राजकीय चातुर्य वापरून खेळी खेळली आहे. मुख्यमंत्रिपदावरून जे महाभारत २०१९ साली रंगले तसेच महाभारत महापौरपदावरून रंगण्याची शक्यता यामुळे पुन्हा निर्माण झाली आहे. असे असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही राजकीय डावपेच खेळायला सुरुवात केली आहे. मुंबईत आपला महापौर व्हायला पाहिजे हे स्वप्न असल्याचे ते म्हणाले. शिवसेनेचा महापौर बसेल एवढे संख्याबळ नाही, याचे दु:ख आहे. पण देवाच्या मनात असेल तर आपला महापौर बसेल, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी महापौरपदावरून सस्पेन्स वाढवला. त्यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थित शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट करीत शिवसेनेच्या जयजयकाराच्या घोषणा दिल्या.
मुंबई महापालिकेतील नवनिर्वाचित नगरसेवकांनी शनिवारी दुपारी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी नगरसेवकांना मार्गदर्शन केले, त्यांच्याशी चर्चा केली. नगरसेवकांच्या चर्चेनंतर त्यांनी मातोश्रीबाहेर जमलेल्या समर्थकांना संबोधित केले.
मुंबईत आपला महापौर व्हायला पाहिजे, देवाच्या मनात असेल तर....
उद्धव ठाकरे म्हणाले, मुंबईचा लागलेल्या निकालाचा मला अभिमान आहे. भारतीय जनता पक्षाने कागदावरची शिवसेना फोडली. पण आजचा निकाल पाहून जमिनीवरची शिवसेना ते फोडू शकले नाहीत, असे त्यांनाही वाटले असेल. साम दाम दंड भेद असे सगळे प्रयत्न त्यांनी केले. पण ते निष्ठा विकत घेऊ शकले नाहीत. मुंबईतल्या निकालानंतर आता आपली जबाबदारी वाढली आहे. आपला महापौर व्हायला पाहिजे हे आपले स्वप्न आहे. देवाच्या मनात असेल तर ते पण होईल, असे ते म्हणताच शिवसैनिकांनी आनंद व्यक्त केला.
advertisement
देवाच्या मनात असेल तर आपला महापौर होईल, ठाकरेंच्या विधानाचा अर्थ काय?
मुंबईत कोणत्याही एका पक्षाला बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. म्हणजेच युती आघाडी करूनच मुंबई पालिकेत सत्ता स्थापन करावी लागेल. असे असताना इच्छित राजकीय समीकरणे आकाराला आली तर आपला महापौर होऊ शकतो, असे उद्धव ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे सांगायचे असावे. याचाच अर्थ पडद्यामागे काहीतरी घडते आहे, हे सूचकपणे उद्धव ठाकरे यांनी सांगण्याचा प्रयत्न केला.
advertisement
आपण उमेदवारांना सोयीसुविधा देऊ शकलो नाही-ठाकरे
प्रतिस्पर्ध्यांनी त्यांच्या उमेदवारांना जशा सोयीसुविधा दिल्या होत्या, तशा सोयीसुविधा आपण देऊ शकलो नाही. कारण त्यांच्याकडे तन-मन-धन होते, आपल्याकडे तन आणि मन आहे, पण धन नाही. आपल्याकडच्या शक्तीच्या जोरावर आपण त्यांना घाम फोडला. हीच शक्ती एकत्र ठेवा, जेणेकरून पुढच्या पिढीला तुमचा अभिमान वाटेल, पैसे मिळत असतानाही आणि गद्दार पैशांनी विकले जात असताना माझे दादा ताई विकले गेले नाहीत, असे भविष्यात ते पुढे सांगतील, असे ठाकरे म्हणाले.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 17, 2026 3:34 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मुंबईत आपला महापौर व्हायला पाहिजे, देवाच्या मनात असेल तर... उद्धव ठाकरेंनी सस्पेन्स वाढवला!









