Thane Water Supply: मुसळधार पाऊस तरीही ठाण्यात उद्भवणार पाणीबाणी, 24 तास पाणीपुरवठा बंद, काय म्हणाली महापालिका?
- Published by:Vrushali Kedar
- Reported by:Bhavna Arvind Kamble
Last Updated:
Thane Water Supply: ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील काही भागांचा पाणीपुरवठा 24 तास पूर्णत बंद राहणार आहे. महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने नागरिकांना या तात्पुरत्या अडचणीबाबत सहकार्य करण्याची विनंती केली आहे.
ठाणे: येत्या गुरुवारी (21 ऑगस्ट) ठाणेकरांना पाण्याच्या तात्पुरत्या तुटवड्याचा सामना करावा लागणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) पाणी पुरवठा योजनेअंतर्गत जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रात आवश्यक देखभाल आणि दुरुस्तीची कामं हाती घेतली जाणार आहेत. ही कामं अत्यंत महत्त्वाची असल्याने यासाठी पाणीपुरवठा तात्पुरता बंद ठेवण्यात येणार आहे. या देखभाल दुरुस्तीमुळे गुरुवारी दुपारी 12 वाजल्यापासून ते शुक्रवारी (22 ऑगस्ट) दुपारी 12 वाजेपर्यंत असा एकूण 24 तास ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील काही भागांचा पाणीपुरवठा पूर्णत बंद राहणार आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने यासंदर्भात अधिकृत निवेदन जारी केलं असून नागरिकांनी याची वेळेवर नोंद घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. शटडाऊन कालावधीत ठाणे शहरातील दिवा, मुंब्रा (प्रभाग क्रमांक 26 आणि 31 मधील काही भाग वगळता) तसेच कळवा प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या सर्व भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. याशिवाय वागळे प्रभागातील रुपादेवी पाडा, किसननगर क्रमांक 2, नेहरूनगर आणि मानपाडा प्रभाग समितीतील कोलशेत खालचा गाव या परिसरांतील नागरिकांनाही या शटडाऊनचा फटका बसणार आहे.
advertisement
पाणीपुरवठा पुन्हा सुरू झाल्यानंतरही पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी शक्य असेल तितका पाण्याचा साठा करून ठेवावा आणि या कालावधीत पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करावा, असं आवाहन महानगरपालिकेनं केलं आहे. महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने नागरिकांना या तात्पुरत्या अडचणीबाबत सहकार्य करण्याची विनंती केली आहे.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
August 19, 2025 11:30 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Thane Water Supply: मुसळधार पाऊस तरीही ठाण्यात उद्भवणार पाणीबाणी, 24 तास पाणीपुरवठा बंद, काय म्हणाली महापालिका?