प्रवाशांचे 2 दिवस होणार हाल? एसटीच्या 69 टक्के बस इलेक्शन मोडवर...
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
एसटीच्या ताफ्यात सध्या स्वमालकीच्या 13 हजार 367 बस आहेत. त्यातील 9 हजार 232 गाड्या राज्यातील 31 विभागांना निवडणुकीच्या कामकाजासाठी देण्यात येणार आहेत.
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. मतदानाची तारीख जसजशी जवळ येतेय, तसतशी राजकीय प्रचार सभांची तोफ जोमानं धडाडतेय. आपले आमदार निवडून देण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसलीये. तर दुसरीकडे, राज्यात एकाच टप्प्यात होणारी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी निवडणूक आयोगही सज्ज आहे. मतदानाचे यंत्र, साहित्य आणि मतदान पथकांना मतदान केंद्रापर्यंत नेऊन सोडण्याची आणि तिथून मतमोजणीसाठी नेण्याची जबाबदारी राज्य परिवहन (एसटी) महामंडळावर सोपविण्यात आली आहे.
निवडणूक आयोगानं 19 नोव्हेंबर आणि 20 नोव्हेंबर अशा 2 दिवसांसाठी एसटीकडे तब्बल 9 हजार बसची मागणी केली. त्यापैकी 19 नोव्हेंबरला मतदान केंद्रावर साहित्य घेऊन जाण्यासाठी 8 हजार 978 बस वापरल्या जाणार आहेत आणि 20 नोव्हेंबरला मतदान झाल्यानंतर यंत्र मतमोजणीच्या ठिकाणी नेण्यासाठी तेवढ्याच गाड्या वापरात असतील. तसंच 245 बस पोलीस प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
advertisement
निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव. प्रत्येक सजग भारतीय नागरिकानं देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपलं बहुमूल्य मत द्यायलाच हवं. अर्थात 20 नोव्हेंबरला राज्यात मोठ्या संख्येनं नागरिक घराबाहेर पडतील. अशात हजारोंच्या संख्येनं बस निवडणूक प्रक्रियेसाठी धावणार असल्यानं नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात नागरिकांच्या सोयीसाठी एसटीनं गाड्यांचं योग्य ते नियोजन केलं असेलच. परंतु तरीही नागरिकांनी गाड्यांची संख्या आणि वेळ पाहून प्रवास करणं जास्त सोयीचं ठरेल. जेणेकरून वेळेत मतदान होईल आणि आपलं पुढचं वेळापत्रकही कोलमडणार नाही. मिळालेल्या माहितीनुसार, 1 हजार खासगी स्कूल बस आणि 400 बेस्ट बसदेखील निवडणूक प्रक्रियेसाठी वापरण्यात येणार आहेत.
advertisement
दरम्यान, एसटीच्या ताफ्यात सध्या स्वमालकीच्या 13 हजार 367 बस आहेत. त्यातील 9 हजार 232 गाड्या राज्यातील 31 विभागांना निवडणुकीच्या कामकाजासाठी देण्यात येणार आहेत. एवढ्या मोठ्या संख्येनं बस तैनात करणं हे मोठं आव्हान आहे खरं, परंतु मतदान प्रक्रियेत कोणताही अडथळा येणार नाही याची काळजी घेतली जाईल, असं एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
advertisement
एसटीला काय फायदा?
view commentsलोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसाठीही एसटी बस धावल्या होत्या. त्यावेळी मार्ग आणि किलोमीटरप्रमाणे भाडं ठरविण्यात आलं. त्यातून एसटीला एका बससाठी जवळपास 24 ते 30 हजार रुपये उत्पन्न मिळालं. आता विधानसभा निवडणुकीतही याचप्रमाणे भाडेआकारणी होणार आहे, त्यामुळे एसटीला तसाच फायदा होण्याची शक्यता आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 12, 2024 10:04 AM IST


