Shirdi Crime : आधी उघड धमकी; मग भर चौकात सपासप वार, दुहेरी हत्याकांडानंतर शिर्डी पुन्हा हादरली
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
दुहेरी हत्याकांडाची घटना ताजी असतानाच शिर्डीमध्ये तरुणावर चाकूने वार करण्यात आले आहे.
हरिष दिमोटे, प्रतिनिधी
शिर्डी : दुहेरी हत्याकांडाची घटना ताजी असतानाच शिर्डीमध्ये तरुणावर चाकूने वार करण्यात आले आहे. निवृत्त नगरपालिका कर्मचाऱ्याच्या मुलावर हा हल्ला करण्यात आला आहे. काहीच दिवसांपूर्वी निवृत्त नगरपालिका कर्मचारी शौकत शेख यांना गुंडांकडून धमकी मिळाली होती, त्यानंतर आता शौकत शेख यांचा 35 वर्षांचा मुलगा सादिक शेख याच्यावर चाकूने वार करण्यात आले आहेत.
advertisement
शिर्डी शहरातील श्रीरामनगर परिसरात अज्ञातांनी भाजी आणि धान्य विक्रेत्या तरुणावर वार केले. जखमी तरुणावर साईबाबा सुपर स्पेशलिटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्ल्यानंतर शिर्डी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
सादिक शेख याच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणी पोलिसांनी तीन संशयीतांना ताब्यात घेतलं आहे. हल्ल्याच्या या घटनेनंतर शिर्डीमधील ग्रामस्थांनी पोलीस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. वाढत्या गुन्हेगारीविरोधात शिर्डीतील जनता आक्रमक झाली आहे. दुहेरी हत्याकांडानंतर पोलिसांकडून शहरात कारवाईचा धडाका सुरू असतानाच चाकू हल्ल्याने शिर्डी हादरली आहे.
advertisement
साई संस्थानच्या दोघांची हत्या
मागच्याच आठवड्यात शिर्डीमध्ये साई संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. तीन वेगवेगळ्या ठिकाणी तीन लोकांवर हा हल्ला करण्यात आला. तिघंही पहाटेच्या सुमारास कामावर जात होते, यावेळी दबा धरुन बसलेल्या मारेकऱ्यांनी हा हल्ला केला आहे. या हल्ल्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला.
सुभाष साहेबराव घोडे आणि नितीन कुष्णा शेजुळ असं हत्या झालेल्या दोघांची नावं आहेत. दोघंही साई संस्थानचे कर्मचारी होते. सुभाष घोडे यांच्यावर कर्डोबा नगर चौकात हल्ला करण्यात आला, तर नितीन शेजुळ यांच्यावर साकुरी शिव परिसरात हल्ला झाला. हा हल्ला इतका भीषण होता की दोघांचाही मृत्यू झाला.
Location :
Shirdi,Ahmadnagar,Maharashtra
First Published :
February 11, 2025 9:54 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Shirdi Crime : आधी उघड धमकी; मग भर चौकात सपासप वार, दुहेरी हत्याकांडानंतर शिर्डी पुन्हा हादरली