युवा शेतकऱ्याची कमाल, 50 व्या दिवशी बाजारात माल अन् एकरात 3 लाखांची कमाई
- Published by:News18 Marathi
Last Updated:
युवा शेतकऱ्याने पारंपरिक शेतीला फाटा देत एक एकर क्षेत्रात वेगळा प्रयोग केला. आता लाखोंची कमाई होतेय.
छत्रपती संभाजीनगर, 27 ऑगस्ट: पारंपरिक शेतीतून मिळणारे उत्पन्न आणि लागणारा खर्च याचा वर्षाअंती हिशोब काढला तर बऱ्याचदा शेतकऱ्याच्या हातात काहीच शिल्लक राहत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे कर्जाचा डोंगर उभा होऊन त्यातून सावरताना नाकीनऊ येतात. ही परिस्थिती टाळण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रहीमाबादच्या एका युवा शेतकऱ्याने पारंपारिक शेतीला फाटा देत आपल्या शेतात बीन्सची लागवड केली. आता एक एकार बीन्स शेतीतून अंकुश पाटील हे लाखोंचे उत्पन्न घेत आहेत.
पारंपरिक शेतीला फाटा
सिल्लोड तालुक्यातील रहिमाबादचे युवा शेतकरी अंकुश पाटील हे दरवर्षी आपल्या शेतात पारंपारिक पद्धतीने पीके घेत होते. मात्र त्यांच्यावरील संकटं थांबायला नाव घेत नव्हती. म्हणून त्यांनी एक एकारावर शेडनेट तयार करुन त्यात बीन्सची लागवड करण्याचा निर्णय घेतला. बीन्सच्या लागवडीसाठी माती, हवामान, सिंचन व्यवस्था यासह सर्व व्यवस्थापनाची कामे योग्य पद्धतीने केली. साडेचार बाय दीड फुट अंतरावर बीन्सची लागवड केली. त्यानंतर याची चांगली जोपासना केली. अवघ्या 50 दिवसांत बीन्सची तोडणी सुरू झाली. त्यामुळे अवघ्या 80 दिवसांत 100 ते 150 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन घेता आले, असे अंकुश पाटील यांनी सांगितले.
advertisement
बीन्सला मोठी मागणी
बीन्स हे वेलवर्गीय असल्याने नुकसान होऊ नये म्हणून त्यास तारकाठीने बांधावे लागते. तसेच या पिकावरती फवारणी अत्यंत कमी प्रमाणात लागते. त्यामुळे औषध पाण्याचा खर्चातही मोठ्या प्रमाणात बचत होते. तसेच बीन्सला मुंबई, दिल्ली, पुणे, हैदराबाद, छत्रपती संभाजीनगर, कोलकाता सह इतर बाजार पेठांमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असते. तसेच शहरातील मोठमोठ्या मॉलमध्ये जास्त प्रमाणात असते. त्यामुळे व्यापारी थेट शेतामध्ये येऊन खरेदी करून घेऊन जात आहे.
advertisement
एकरातून तीन लाखांचे उत्पन्न
बीन्सच्या शेंगा काढताना अत्यंत काळजीपूर्वक काढाव्या लागतात. वेळेत जर काढली तर उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ होते. तसेच वेलांना फुले लवकर लागतात. या वेलांना तब्बल तीन ते चार महिने शेंगा लागत असतात. या चार महिन्याच्या तोडीच्या वेळेत शेतकरी एक एकरातून कमीत कमी तीन पेक्षा जास्त लाख रुपये निव्वळ नफा कमवू शकतो, असे रहिमाबाद येथील युवा शेतकरी अंकुश पाटील यांनी सांगितले.
Location :
Chhatrapati Sambhaji Nagar,Maharashtra
First Published :
August 27, 2023 5:04 PM IST