BMC Election: मुंबई पालिकेत पराभव का झाला? वंचित आघाडीने काँग्रेसवर केला गंभीर आरोप
- Published by:Sachin S
Last Updated:
"अनेक ठिकाणी काँग्रेसच्याच लोकांनी अपक्ष उमेदवारांना किंवा इतर पक्षांना अंतर्गत पाठिंबा देऊन आघाडीला हरवण्याचे काम केले.
मुंबई : महानगरपालिका निवडणुकीच्या निकाल जाहीर झाला असून भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. पण, या निवडणुकीत पहिल्यांदाच काँग्रेसने वंचित बहुजन विकास आघाडीला सोबत घेतलं होतं. काँग्रेसने २४ जागा जिंकल्या आहेत पण, वंचितला भोपळाही फोडता आला नाही. अखेरीस, या पराभवाचं खापर वंचित आघाडीने काँग्रेसवरच फोडलं आहे. त्यामुळे आगामी काळात काँग्रेस आणि वंचितमध्ये वाद पेटण्याची चिन्ह आहे.
वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष आणि मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी पत्रकार परिषद घेऊन मुंबई आणि राज्याभरातील पालिका निवडणुकीच्या पराभवावर भूमिका मांडली. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे.
मुंबईत काँग्रेसमुळे पराभव
"मुंबई महानगरपालिकासाठी काँग्रेसला सांगितलं होतं की, अल्पसंख्यांक मतदाराला गृहीत धरू नये. मुंबईत काँग्रेसने मुस्लिम मतदारांना सोबत ठेवण्याचे प्रयत्न केले नाहीत आणि अंतर्गत गटबाजी रोखली नाही, परिणामी वंचित बहुजन आघाडीला हक्काच्या जागा गमवाव्या लागल्या," असं म्हणत मोकळेंनी काँग्रेसवर निशाणा साधला.
advertisement
मुंबईत युतीचा धर्म फक्त वंचितनेच पाळला?
"वंचित बहुजन आघाडी ज्यावेळी युती करते, ती अतिशय प्रामाणिकपणे पाळते. मुंबईतही आम्ही शेवटपर्यंत आघाडीच्या बाजूने काम केलं, ज्याचा फायदा काँग्रेसच्या उमेदवारांना झाला. मात्र, दुर्दैवाने काँग्रेसकडून तसा प्रतिसाद वंचितला मिळाला नाही. मुंबईतील मुस्लिम मतदार काँग्रेसपासून दुरावत असल्याची पूर्वकल्पना आम्ही वारंवार देऊनही काँग्रेस नेत्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मुस्लिम मतदार AIMIM किंवा इतर पक्षांकडे वळल्याने आघाडीला मोठा फटका बसला' असंही मोकळे म्हणाले.
advertisement
'अंतर्गत गटबाजी आणि छुप्या पाठिंब्याचा फटका'
"अनेक ठिकाणी काँग्रेसच्याच लोकांनी अपक्ष उमेदवारांना किंवा इतर पक्षांना अंतर्गत पाठिंबा देऊन आघाडीला हरवण्याचे काम केले. मुंबईत आमच्या हक्काच्या १५ ते २० जागा होत्या, जिथे विजयाची १०० टक्के खात्री होती. त्याठिकाणी काँग्रेस ने स्वतः चा मतदार हा जाणीव पूर्वक सोडून दिला, तो राखला नाही, असं आम्हाला बोलाव लागत आहे. शेवटी, लातूर आणि नांदेडप्रमाणे काँग्रेसने मुंबईतही समन्वय दाखवला असता, तर आज मुंबईचे चित्र वेगळे असते, अशी खंत सिद्धार्थ मोकळे यांनी व्यक्त केली.
advertisement
ज्या ठिकाणी काँग्रेसने वंचित सोबत प्रामाणिक राहिले, त्या ठिकाणी दोघं पक्षांना त्याचा फायदा झाला. मात्र, ज्या ठिकाणी काँग्रेसने प्रामाणिकपणा ठेवला नाही त्याठिकाणी दोन्ही पक्षांना किंमत चुकवावी लागली. याचा जास्त फटका वंचित बहुजन आघाडीला बसला, असंही मोकळे म्हणाले.
संभाजीनगरात ४ उमेदवारांच्या पराभवावर संशय
"छत्रपती संभाजीनगर पालिका निकालांवर संशय व्यक्त करताना मोकळे यांनी गंभीर आरोप केला. छत्रपती संभाजीनगरमध्ये आमचे ८ उमेदवार निवडून येत होते, मात्र मतमोजणीच्या शेवटी एक बंद पडलेले मशीन आणले गेले. त्यात फेरफार करून अडीच हजार मतांनी आघाडीवर असलेल्या आमच्या ४ उमेदवारांना तांत्रिक कारणाखाली पराभूत घोषित करण्यात आलं आहे. त्याला कायदेशीर मार्गाने लढा दिलाा जाईल, असं मोकळेंनी सांगितलं.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 17, 2026 11:59 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
BMC Election: मुंबई पालिकेत पराभव का झाला? वंचित आघाडीने काँग्रेसवर केला गंभीर आरोप










