Mumbai Local Accident : 'पुढच्या डब्यातून एकजण उडाला अन् तिघांना घेऊन गेला', प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Mumbai Local Train Accident : आजच्या अपघाताच्या वेळी नेमकं काय झालं, याची माहिती समोर येत आहे. काही प्रवाशांसाठी डेथलाईन ठरलेल्या लोकलमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने सगळा घटनाक्रम सांगितला.
मुंबई: सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास मुंब्रा आणि दिवा स्थानकांदरम्यान एका भीषण रेल्वे अपघातात सहा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. सकाळच्या गर्दीच्या वेळी घडलेल्या या घटनेमुळे लोकल प्रवासातील सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. आजच्या अपघाताच्या वेळी नेमकं काय झालं, याची माहिती समोर येत आहे. काही प्रवाशांसाठी डेथलाईन ठरलेल्या लोकलमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने सगळा घटनाक्रम सांगितला.
ऐन गर्दीच्या वेळी धावत्या ट्रेनमधून प्रवासी ट्रॅकवर पडल्याची माहिती मिळाली आहे. दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान ट्रेनमधून पडून 6 प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. या अपघातानंतर रेल्वे रुळांवर रक्ताचा सडा दिसून आला. तर, काही मृत प्रवाशांचे मृतदेह प्लॅटफॉर्मवर ठेवण्यात आल्याने प्लॅटफॉर्मवरही रक्ताने माखले असल्याचे अस्वस्थ करणारे चित्र दिसून आले.आज सकाळी 10 ते 12 प्रवासी ट्रेनमधून पडल्याची माहिती समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. दिवा स्थानकातही दोन प्रवासी पडले असल्याची माहिती समोर आली आहे. हे दोन्ही प्रवासी महिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या अपघातासाठी रेल्वे प्रशासना जबाबदार असल्याचे समोर आले आहे.
advertisement
लोकलमधील प्रवाशाने काय सांगितलं?
मुंबई उपनगरी रेल्वेच्या धावत्या लोकल गाड्यांमध्ये आज सकाळी एक भयावह अपघात घडला. मुंब्रा आणि दिवा स्थानकादरम्यान दोन लोकल गाड्या अगदी जवळून जात असताना, दरवाज्यांजवळ लटकलेल्या प्रवाशांची बॅग एकमेकांवर आदळल्याने मोठी दुर्घटना घडली. सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमधील एका प्रत्यक्षदर्शी प्रवाशाने सांगितले की, “आम्ही भिवंडीहून कामासाठी निघालो होतो. आमच्या ग्रुपमधील एक मित्र या अपघातात ट्रॅकवर पडला. मुंब्रा स्थानकाजवळ आमच्या आधीच्या डब्यातून एक प्रवासी उडत आला आणि आमच्या डब्यातील तीन जणांना घेऊन गेला. त्यानंतर मागील डब्यातूनही काही प्रवासी ट्रॅकवर कोसळले.” अपघातानंतर अनेक प्रवासी जखमी झाले असून, काहींना ठाणे स्थानकात उतरवून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आम्ही ठाणे स्थानकात आल्यानंतर तातडीने रुग्णालयात आलो असल्याचे त्यांनी सांगितले.
advertisement
नेमका कसा घडला अपघात?
आज सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली. दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान दोन लोकल गाड्या – एक कसाराकडे जाणारी आणि दुसरी सीएसएमटीकडे जाणारी – एकमेकांच्या अगदी शेजारील ट्रॅकवरून भरधाव वेगाने जात होत्या. दरवाज्याजवळ लटकलेल्या प्रवाशांच्या पाठीवरील बॅगांची एकमेकांशी घर्षण होऊन धक्क्याने संतुलन ढासळले आणि काही प्रवासी ट्रॅकवर फेकले गेले.
view commentsLocation :
Thane,Maharashtra
First Published :
June 09, 2025 1:01 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Local Accident : 'पुढच्या डब्यातून एकजण उडाला अन् तिघांना घेऊन गेला', प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग


