Mumbai : तिकीट विचारल्याचा राग, मुंबईत तीन प्रवाशांची टीसीला बेदम मारहाण
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
मुंबईतल्या लोकल ट्रेनमध्ये तिकीट चेकिंगला आलेल्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे.
मुंबई : मुंबईतल्या लोकल ट्रेनमध्ये तिकीट चेकिंगला आलेल्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे. सोमवारी पालघर जिल्ह्यातील बोईसर रेल्वे स्टेशनवर ही घटना घडली आहे. बोईसर रेल्वे स्टेशनवर तैनात असलेल्या टीसीने तीन प्रवाशांना तिकीट दाखवायला सांगितलं. या तिघांकडेही तिकीट नव्हतं, त्यामुळे टीसीने प्रत्येक व्यक्तीला 280 रुपये दंड द्यायला सांगितला. यावर संतापलेल्या प्रवाशांनी टीसीला मारहाण केली आहे.
पोलिसांनी याप्रकरणातल्या तीनही आरोपींची ओळख पटवली आहे. उत्सव विशाल कोठी (वय 20 वर्ष), विशाल वासुदेव कोठी (वय 42 वर्ष), अनिल गोपालराव रावते (वय 44 वर्ष) अशी आरोपींची नावं आहेत. हे सगळे आरोपी बोईसरच्या दांडीपाडा भागातील रहिवासी आहेत.
याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम 121 (1) (सरकारी कर्मचाऱ्याला त्याच्या कामापासून रोखणे) आणि 132 ( सरकारी कर्मचाऱ्यावर काम करत असताना हल्ला करणे) असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, पण अजूनपर्यंत आरोपींना अटक करण्यात आलेली नाही.
advertisement
तिकीट चेक करणाऱ्या कर्मचाऱ्यावर हल्ल्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी नालासोपारा रेल्वे स्टेशनवरही एका प्रवाशाने टीसीवर हल्ला केला होता. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना विना तिकीट प्रवास करू नका तसंच तिकीट चेक करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करा, असं आवाहन केलं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 11, 2025 11:35 PM IST