7 दिवसानंतरही झाले तरी नाही IPS अधिकाऱ्याचे पोस्टमार्टम, आठवले थेट घरी पोहोचले; IAS पत्नीने ठेवली अट
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
IPS Puran Kumar: हरियाणातील आयपीएस पूरण कुमार आत्महत्येच्या प्रकरणात तणाव चिघळला आहे. आयएएस पत्नीने डीजीपीला हटवण्याची आणि आरोपींना अटक करण्याची मागणी करत पोस्टमॉर्टमला ठाम नकार दिला आहे.
चंदीगड : हरियाणातील आयपीएस अधिकारी वाय. पूरण कुमार यांच्या आत्महत्येच्या प्रकरणाने नव्या वळण घेतले आहे. सोमवारी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी चंदीगडमध्ये हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी आणि दिवंगत आयपीएस अधिकारी पूरण कुमार यांच्या पत्नी, आयएएस अधिकारी अमनीत पी. कुमार यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी कुटुंबाला शवविच्छेदनासाठी (पोस्टमॉर्टम) तयार करण्याचा प्रयत्न केला, परंतु आयएएस पत्नीने स्पष्ट शब्दांत सांगितले की, जोपर्यंत हरियाणाचे डीजीपी शत्रुजीत कपूर यांना पदावरून हटवले जात नाही आणि सर्व आरोपींना अटक केली जात नाही, तोपर्यंत पोस्टमॉर्टम होणार नाही.
advertisement
मुख्यमंत्री आणि मंत्री आमनेसामने
रामदास आठवले यांनी जेव्हा मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांची भेट घेतली आणि संबंधित अधिकाऱ्यांना अटक करण्याची मागणी केली. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी सांगितले की- प्रथम पोस्टमॉर्टम पूर्ण होणे आवश्यक आहे, त्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल. आठवले यांनी नंतर पत्रकार परिषदेत सांगितले की, ते आयपीएस पूरण कुमार आत्महत्या प्रकरणात कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आले आहेत आणि हे त्यांचे नैतिक व सामाजिक कर्तव्य आहे.
advertisement
घटनेचा पार्श्वभूमी
ही घटना 7 ऑक्टोबर 2025 रोजी घडली होती. आयपीएस अधिकारी वाय. पूरण कुमार यांनी आपल्या चंदीगड येथील घराच्या बेसमेंटमध्ये स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. घटनास्थळावरून आत्महत्येचा एक सुसाइड नोट मिळाला आहे, ज्यात हरियाणाचे डीजीपी शत्रुजीत कपूर यांच्यासह अनेक आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांची नावे नमूद केली आहेत. त्यामुळे हे प्रकरण अधिक गंभीर बनले असून कुटुंबीयांनी या अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाईची मागणी केली आहे. दुसरीकडे प्रशासनाने कुटुंबाच्या संमतीशिवाय पोस्टमॉर्टम न करण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement
केंद्रीय राज्यमंत्री यांची पत्रकार परिषद
रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की- त्यांनी सर्वप्रथम पूरण कुमार यांच्या कुटुंबाशी भेट घेतली. ते चंदीगडमधील सेक्टर 24 येथील अमनीत पी. कुमार यांच्या निवासस्थानी गेले. त्यांनी अमनीत यांना विनंती केली की, न्यायासाठी पोस्टमॉर्टम आवश्यक आहे आणि त्यामुळे त्यांनी त्यासाठी परवानगी द्यावी.
advertisement
मात्र आयएएस अमनीत पी. कुमार यांनी स्पष्टपणे नकार दिला आणि सांगितले, प्रथम हरियाणाचे डीजीपी शत्रुजीत कपूर यांना त्यांच्या पदावरून हटवा. तसेच सुसाइड नोटमध्ये उल्लेख केलेल्या सर्व आरोपींना अटक करा; त्यानंतरच मी पोस्टमॉर्टमसाठी परवानगी देईन.
advertisement
मंत्री आठवले यांनी सांगितले की, ते लवकरच कुटुंबाशी पुन्हा एकदा चर्चा करतील आणि तोडगा काढण्याचा प्रयत्न करतील. आठवले आणि मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांच्यासोबत सुमारे ४० मिनिटे चर्चा झाली. सैनी यांनी त्यांना आश्वासन दिले की, आयपीएस आत्महत्येच्या प्रकरणात संपूर्ण आणि निष्पक्ष चौकशी केली जाईल. परंतु त्यांनी त्याचबरोबर हेही म्हटले की शवविच्छेदनाशिवाय पुढील तपास पुढे नेता येणार नाही.
advertisement
माझ्या राज्यातील अधिकाऱ्याच्या कुटुंबासाठी आलो – आठवले
आयपीएस वाय. पूरण कुमार मूळचे हैदराबाद येथील होते. ते माझ्या गृहराज्यातील असल्याने आणि दलित समाजातून आलेले असल्याने, मला या प्रकरणात वैयक्तिक जबाबदारी वाटते, असं आठवले म्हणाले. माझं मंत्रालय दलित आणि सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी कार्यरत आहे. त्यामुळे माझं कर्तव्य आहे की मी पूरण कुमार यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत.
नोटमध्ये लिहिलेल्या नावांवरच होईल कारवाई
आठवले म्हणाले की, आयपीएस पूरण कुमार यांना त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांना अटक करून त्यांना तत्काळ निलंबित केलं पाहिजे. आत्महत्येच्या नोटमध्ये ज्यांची नावे नमूद आहेत, त्यांच्याविरोधातच चौकशी आणि कारवाई होईल.
या संपूर्ण घटनेमुळे हरियाणा प्रशासनावर आणि पोलीस यंत्रणेवर प्रचंड दबाव निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री दोघेही कुटुंबाला वेगळ्या पद्धतीने समजावत असले; तरी कुटुंबाचा ठाम आग्रह आहे की, न्याय मिळाल्याशिवाय पोस्टमॉर्टम होणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 13, 2025 8:14 PM IST
मराठी बातम्या/देश/
7 दिवसानंतरही झाले तरी नाही IPS अधिकाऱ्याचे पोस्टमार्टम, आठवले थेट घरी पोहोचले; IAS पत्नीने ठेवली अट