Railway: रेल्वेकडून अहिल्यानगरकरांना मोठी भेट, पुणे ते नगर प्रवास दीड तासात शक्य
- Published by:Vrushali Kedar
- local18
Last Updated:
Railway: सध्या रस्ते मार्गे नगरहून पुण्याला येण्यासाठी तीन ते चार तास लागतात. हा वेळ रेल्वेमुळे दीडतासांपर्यंत कमी होऊ शकतो.
पुणे: राज्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेले अहिल्यानगर (अहमदनगर) शहर ते पुणे शहर या मार्गावर प्रवास करताना आता वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. ही वाहतूककोंडी फोडण्यासाठी महामार्गाला समांतर दुहेरी रेल्वे मार्ग तयार केला जाणार आहे. त्यामुळे अहिल्यानगर ते पुणे प्रवासाचा वेळ वाचणार आहे. सध्या रस्ते मार्गे नगरहून पुण्याला येण्यासाठी तीन ते चार तास लागतात. हा वेळ रेल्वेमुळे दीडतासांपर्यंत कमी होऊ शकतो.
मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने या समांतर रेल्वे मार्गाच्या भूमी सर्वेक्षणाचा अंतिम प्रकल्प अहवाल (डीपीआर) सादर केला आहे. 98 किलोमीटर लांबीच्या या रेल्वे मार्गावर एकूण 12 रेल्वे स्टेशन उभारण्यात येणार आहेत. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सुमारे चार वर्षांचा कालावधी लागू शकतो. प्रस्तावित रेल्वे मार्गावर ताशी 160 किलोमीटर वेगाने रेल्वे धावेल.
advertisement
या प्रकल्पासाठी एकूण 785.898 हेक्टर जमीन जाणार आहे. एकूण जमिनीमध्ये खासगी, वन क्षेत्र आणि सरकारी अशा तिन्ही प्रकारच्या जमिनीचा समावेश आहे. समांतर दुहेरी रेल्वे मार्गासाठी हवेली, शिरूर, पारनेर आणि अहिल्यानगर या चार तालुक्यांतील जमिनीचे भूसंपादन होणार आहे. यासाठी सर्वाधिक जमीन शिरूर तालुक्यातील जाणार आहे.
advertisement
पुणे ते अहिल्यानगर रेल्वे मार्गावरील प्रस्तावित रेल्वे स्टेशन
लोणी काळभोर, कोलवडी, वाघोली, वढू, जातेगाव, रांजणगाव एमआयडीसी, कोहकडी, सुपे एमआयडीसी, कामरगाव, चास आणि अहिल्यानगर ही प्रस्तावित स्थानके आहेत. यापैकी रांजणगाव एमआयडीसी आणि सुपे एमआयडीसी ही मुख्य स्टेशन्स असतील.
सध्या पुणे स्थानकावरून उत्तर भारतात जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या दौंड स्थानकावरून अहिल्यानगरला जातात. यामुळे प्रवाशांचा बराच वेळ वाया जातो. या प्रकल्पाबरोबरच रेल्वे मार्ग वाढवण्याचे नियोजन सुरू आहे. त्यानुसार तळेगाव ते उरुळी आणि पुणे ते अहिल्यानगर अशा दोन नवीन मार्गावर रेल्वे जाळे विस्तारण्याचे काम रेल्वे बोर्डाकडून हाती घेण्यात येणार आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
August 04, 2025 10:31 AM IST