पिंपरी-चिंचवडमध्ये रेकॉर्ड ब्रेक पाऊस; पवना धरण फुल्ल, पाण्याची चिंता मिटली, पण धोक्याचा इशारा!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
Pimpri-Chinchwad News: गेल्या 2 दिवसांत पिंपरी – चिंचवड परिसरात रेकॉर्डब्रेक पाऊस झाला आहे. पवना धरण 100 टक्के भरले असून नदीतील विसर्ग वाढवला आहे.
पुणे : गेल्या 2 दिवसांपासून पुण्यातील घाटमाथा परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. मावळ, मुळशी आणि खेड परिसरात 24 तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. चिंचवडमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे पवना धरण सोमवारी सायंकाळी पाचपर्यंत 98 टक्के भरले होते आता धरण शंभर टक्के भरल्याने शहराच्या पुढील वर्षीच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये जोरदार पाऊस
गेल्या काही दिवसांपासून पुण्यात पावसाने उघडीप दिली होती, पण रविवारपासून पुन्हा पावसाचे आगमन झाले. सोमवारी दुपारी जोरदार पावसाची बॅटिंग सुरू होती, पण दुपारी काहीसा जोर कमी झाला. सायंकाळी अचानक आलेल्या पावसामुळे नोकरदार वर्ग तसेच विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली. तर पिंपरी आणि चिंचवडमध्ये दुपारी विजेचा पुरवठा खंडित झाला होता.
advertisement
पवना धरणातून विसर्ग वाढवला
पिंपरी-चिंचवड शहरातील चिंचवड, निगडी, आकुर्डी, थेरगाव, वाकड, पुनावळे, किवळे, रावेत, सांगवी, नवी सांगवी, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख, पिंपळे गुरव, दापोडी, बोपखेल, मोशी, चन्होली, दिघी, चिखली आणि तळवडे या भागात जोरदार पाऊस झाला. यामुळे उपनगरातील रस्त्यांवर पाणी साचले आणि नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला.पवना धरण क्षेत्रात सतत पाऊस सुरू असल्यामुळे धरणातून नदीमध्ये विसर्ग वाढवण्यात आला आहे.
advertisement
मावळातील पवना धरण परिसरात सोमवारी 35 मिमी पाऊस नोंद झाला. यापूर्वी मावळात एकूण 1,921 मिमी पाऊस पडला आहे. सर्वाधिक पाऊस 29 मिमी चिंचवडला झाला, तर दापोडी आणि मोशी या भागांनाही भरपूर पावसाची नोंद झाली
सतर्कतेचा इशारा
पिंपरी-चिंचवड शहरातून पवना, इंद्रायणी आणि मुळा या तीन नद्या वाहतात. पवना धरण परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू असल्यामुळे नद्यांमधील विसर्ग वाढवण्यात आला आहे. शहरातील नदीकाठच्या भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. महापालिकेने पूर नियंत्रणासाठी आवश्यक तयारी पूर्ण केली असून, प्रभागस्तरावर नागरिकांना सजग राहण्याचे निर्देश दिले आहेत.
advertisement
दरम्यान, 18 ऑगस्ट रोजी, पवना धरणातून 1400 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला. यामुळे नदीच्या पातळीत वाढ झाली असून, नागरिकांनी सावध राहावे, असे पवना धरण पूरनियंत्रण कक्षाकडून सूचित करण्यात आले आहे.
view commentsLocation :
Pimpri Chinchwad,Pune,Maharashtra
First Published :
August 19, 2025 9:54 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
पिंपरी-चिंचवडमध्ये रेकॉर्ड ब्रेक पाऊस; पवना धरण फुल्ल, पाण्याची चिंता मिटली, पण धोक्याचा इशारा!


