Pune Water: पुणेकरांचं पाण्याचं टेन्शन संपलं, पाणीपुरवठा करणारं कोणतं धरण किती भरलं?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
Pune Water: यंदा पुणेकरांची पाण्याची चिंता मिटणार आहे. धरण क्षेत्रातील जोरदार पावसामुळे पाणीपुरवठा करणारी धरणे 70 टक्क्यांहून अधिक भरली आहेत.
पुणे : पुणे शहर आणि परिसरात मागील काही दिवसांपासून समाधानकारक पावसाची नोंद झाली आहे. घाटमाथा आणि आसपासच्या भागांमध्येही पावसाने चांगली हजेरी लावली आहे. विशेषतः यावर्षी मे महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख धरणांमध्ये समाधानकारक पाणी साठा झालेला आहे.
पुणेकरांचा मुख्य जलस्रोत असलेले खडकवासला धरण सध्या 59.60 टक्के भरले आहे. या धरणाची एकूण साठवण क्षमता 86 दशलक्ष घनमीटर आहे. यातील सध्या 63.32 दशलक्ष घनमीटर पाणी साठा झालेला आहे. खडकवासला हे शहरातील पाणीपुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे धरण असल्याने हा साठा दिलासादायक मानला जातो.
advertisement
मुळशी तालुक्यातील टेमघर धरणाची एकूण क्षमता 3.812 अब्ज घनफूट (टीएमसी) आहे. सध्या या धरणात 73.77 दशलक्ष घनमीटर पाणी असून, ते 67.44 टक्के भरले आहे.
पानशेत धरणाची एकूण साठवण क्षमता 225.77 दशलक्ष घनमीटर आहे, ते 71.87 टक्के भरले आहे. हे धरण पावसाळ्यात पाणी साठवणीत महत्त्वाचे मानले जाते.
याशिवाय, वरसगाव धरण हे मुळशी नदीवर बांधलेले असून त्याची एकूण साठवण क्षमता 293.06 दशलक्ष घनमीटर आहे. हे धरण सध्या 77.34 टक्के भरले आहे, जे सर्व धरणांमध्ये सर्वाधिक भरलेले आहे.
advertisement
एकूणच, सध्या पुण्यातील सर्वच प्रमुख धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा आहे. अजून काही दिवस पावसाचा जोर कायम राहिल्यास आगामी काही महिन्यांसाठी शहराचा पाणीपुरवठा सुरळीत राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पावसाळ्याचे अजून दोन महिने बाकी असल्याने धरणे लवकरच पूर्ण क्षमतेने भरतील, अशी माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
July 15, 2025 7:24 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Water: पुणेकरांचं पाण्याचं टेन्शन संपलं, पाणीपुरवठा करणारं कोणतं धरण किती भरलं?