जवळचे असो वा दूरचे, रिक्षाचे भाडे नाकारणे महागात पडणार, पुण्यात थेट कारवाई, कुठं कराल तक्रार?
- Reported by:Prachi Balu Kedari
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Pune News: कोणत्याही ऑटो रिक्षाचालकाने नियमांचे पालन न केल्यास दंडात्मक कारवाईसह परवाना निलंबन करण्यात येईल.
पुणे : शहरात जवळचे-दूरचे भाडे नाकारणे, मीटरनुसार भाडे न आकारता मनमानी दर वसूल करणे, मीटर फास्ट ठेवणे, जादा प्रवासी भरणे व प्रवाशांशी उद्धट वर्तन अशा तक्रारी सातत्याने वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) एप्रिल ते डिसेंबर 2025 या नऊ महिन्यांत व्यापक तपासणी मोहीम राबवली. या कालावधीत 4896 ऑटो रिक्षांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 1877 रिक्षाचालक दोषी आढळले आहेत. नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करत 105 रिक्षांचे परवाने निलंबित करण्यात आले, तर उर्वरित दोषींवर दंडात्मक कारवाई करून एकूण 8 लाख 67 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
आरटीओकडील आकडेवारीनुसार, जादा भाडे आकारण्याच्या 87, मीटर फास्टच्या 46, जादा प्रवाशांच्या 29, भाडे नाकारण्याच्या 119, उद्धट वर्तनाच्या 86 आणि इतर प्रकारच्या तक्रारींसह एकूण 1877 प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली. विशेषतः स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे रेल्वे स्थानक परिसरात रात्री-बेरात्री प्रवाशांची संख्या अधिक असल्याने या ठिकाणी रिक्षाचालकांकडून अडवणूक व अवाच्या सव्वा भाडे आकारले जात असल्याच्या तक्रारी वारंवार येत आहेत.
advertisement
तक्रार कुठे करायची?
आरटीओ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, प्रवाशांनी अशा प्रकारच्या गैरप्रकारांकडे दुर्लक्ष करू नये. अनेक प्रवाशांना तक्रार कशी व कुठे करायची याची माहिती नसल्यामुळे फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आरटीओने तक्रार नोंदविण्यासाठी व्हॉट्सअॅप क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. प्रवाशांनी 8275330101 या क्रमांकावर तक्रारदाराचे नाव, मोबाइल क्रमांक, प्रवासाचा मार्ग, वाहन क्रमांक, दिनांक-वेळ आणि तक्रारीचे स्वरूप थोडक्यात पाठवावे. शक्य असल्यास फोटो जोडल्यास तक्रारीवर तत्काळ कारवाई केली जाईल.
advertisement
कोणत्याही ऑटो रिक्षाचालकाने नियमांचे पालन न केल्यास दंडात्मक कारवाईसह परवाना निलंबन करण्यात येईल. जादा भाडे, भाडे नाकारणे, मीटर फास्ट, उद्धट वर्तन अशा तक्रारी गंभीरपणे घेतल्या जातील, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी दिली. आरटीओच्या या कडक भूमिकेमुळे प्रवाशांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 28, 2026 11:26 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
जवळचे असो वा दूरचे, रिक्षाचे भाडे नाकारणे महागात पडणार, पुण्यात थेट कारवाई, कुठं कराल तक्रार?









