PMPML E-Bus : गेल्या वर्षापासून रखडलेला प्रकल्प अखेर मार्गी? पुणेकरांचा प्रवास सुखकर करणारी 'ती' घोषणा झाली
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
पुणेकरांसाठी सार्वजनिक वाहतुकीच्या बाबतीत एक आनंदाची बातमी आहे. 'पीएमपी'च्या ताफ्यात ५० नवीन वातानुकूलित ई-बस दाखल होणार आहेत.
पुणे : पुणेकरांसाठी सार्वजनिक वाहतुकीच्या बाबतीत एक आनंदाची बातमी आहे. जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत 'पीएमपी'च्या (PMPML) ताफ्यात ५० नवीन वातानुकूलित ई-बस दाखल होणार आहेत. या बसचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होण्याची शक्यता असून, यामुळे शहरातील प्रदूषणमुक्त प्रवासाला मोठी गती मिळणार आहे.
प्रसिद्ध 'ओलेक्ट्रा' कंपनीकडून या बस खरेदी करण्यात आल्या आहेत. बसची तांत्रिक तपासणी करण्यासाठी पीएमपीचे एक विशेष पथक सध्या हैदराबाद येथील कारखान्यात दाखल झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यातील २५ बस पुढील ४-५ दिवसांत पुण्यात येतील, तर उर्वरित २५ बस जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत दाखल होतील. या सर्व ५० बस निगडी आगारातून कार्यान्वित केल्या जाणार आहेत.
advertisement
प्रवाशांना होणारा फायदा: या नवीन ई-बसमुळे दररोज प्रवास करणाऱ्या सुमारे ५० हजार प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. गेल्या वर्षी तांत्रिक अडचणींमुळे या बस येण्यास उशीर झाला होता, मात्र आता ही प्रतीक्षा संपली आहे. पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांनी सांगितले की, "बसची तपासणी आणि केंद्रीय रस्ते वाहतूक संस्थेचे (CIRT) प्रमाणपत्र मिळाल्यानंतर या बस तातडीने प्रवाशांच्या सेवेत रुजू होतील."
advertisement
हाय-स्पीड चार्जिंगची सुविधा: निगडी आगारात बस चार्जिंगसाठी मोठी सुधारणा करण्यात येत आहे. येथे नव्याने ५ 'डीसी चार्जर' बसवण्यात येणार आहेत. यामुळे बस चार्ज होण्याचा वेळ ३ तासांवरून अवघ्या ४० ते ५० मिनिटांवर येणार आहे. जलद चार्जिंगमुळे बस रस्त्यात बंद पडण्याचे प्रमाण कमी होईल आणि फेऱ्यांची संख्या वाढल्याने प्रवाशांना जास्त बस उपलब्ध होतील.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 08, 2026 9:07 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
PMPML E-Bus : गेल्या वर्षापासून रखडलेला प्रकल्प अखेर मार्गी? पुणेकरांचा प्रवास सुखकर करणारी 'ती' घोषणा झाली











