Pune Traffic : दिवाळीची खरेदी करण्यासाठी बाहेर पडलेल्या पुणेकरांचा झाला मनस्ताप; शहरात नेमकं घडलं काय?
Last Updated:
Pune News : दिवाळी खरेदीसाठी पुण्यात झालेल्या प्रचंड गर्दीत मंत्र्यांच्या दौर्यांची भर पडल्याने वाहतूक ठप्प झाली. मध्यवर्ती भाग आणि उपनगरांमध्ये वाहनांचा तासंतास अडथळा निर्माण झाला.
पुणे : दिवाळी जवळ आल्याने शहरात खरेदीचा उत्साह दिसत आहे. पण या खरेदीसोबतच वाहतुकीची कोंडी आणि मनस्तापही वाढला आहे. शनिवारचा दिवस पुणेकरांसाठी त्रासदायक ठरला. कारण दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठा तुडुंब भरलेल्या होत्या, त्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांचे पुणे दौरे झाल्याने वाहतुकीचा पूर्ण बोजवारा उडाला.
शहरातील रविवार पेठ, लक्ष्मी रस्ता, मंडई, नारायण पेठ, डेक्कन जिमखाना, अप्पा बळवंत चौक आणि बोहरी आळी या भागांत सकाळपासून गर्दी होती. खरेदीसाठी नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडले होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पार्क केलेल्या वाहनांमुळे रस्ते अरुंद झाले आणि वाहनांचा वेग अगदी कमी झाला.
दिवसभर मंत्र्यांचे ताफे शहरातून फिरत असल्याने काही ठिकाणी वाहतूक पूर्णपणे थांबवावी लागली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, दत्तात्रय भरणे आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह अनेक नेत्यांचे दौरे सुरू होते. या ताफ्यांमुळे मुख्य मार्गांवर वाहने तासंतास अडकून पडली.
advertisement
चारचाकी वाहनधारकांनी बाजारपेठेजवळ वाहनतळ नसल्याने गल्ल्यांमध्ये गाड्या उभ्या केल्या. त्यामुळे वाहतूक अधिकच अडखळली. महापालिकेच्या सर्व पार्किंग जागा भरल्याने काहींनी वाहनं नदीपात्राजवळ उभी केली. परिणामी, वाहतुकीचा ताण वाढत गेला आणि नागरिकांना घरपोच पोहोचायला दुहेरी वेळ लागला.
उपनगरांतही अशीच परिस्थिती दिसली. लोहगाव, खराडी, हडपसर, कोथरूड, कात्रज, वारजे आणि धनकवडी भागांतील स्थानिक बाजारपेठा दिवाळी खरेदीसाठी खचाखच भरल्या होत्या. रस्त्यांवर हातगाडीवाले आणि पथारीविक्रेते असल्याने वाहतूक ठप्प झाली. काही ठिकाणी पोलिसांनी वाहतुकीचा ताण कमी करण्याचा प्रयत्न केला, पण गर्दी इतकी प्रचंड होती की उपाय मर्यादितच ठरले.
advertisement
या संपूर्ण परिस्थितीमुळे नागरिक त्रस्त झाले. काहींनी सामाजिक माध्यमांवर वाहतूक कोंडीबद्दल नाराजी व्यक्त केली. दिवाळीच्या खरेदीचा आनंद वाहतूक कोंडीत अडकून गेला, असे अनेकांनी सांगितले. प्रशासनाकडून नियोजनाचा अभाव आणि मंत्र्यांच्या दौर्यांचे वेळापत्रक गर्दीच्या काळात ठेवले गेल्याने त्रास अधिक वाढल्याचे मत नागरिकांनी मांडले.
एकूणच उत्सवाच्या आनंदात वाहतुकीच्या गोंधळाने अडथळा आणला असून पुढील काही दिवसांतही अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 12, 2025 12:57 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Traffic : दिवाळीची खरेदी करण्यासाठी बाहेर पडलेल्या पुणेकरांचा झाला मनस्ताप; शहरात नेमकं घडलं काय?