Vanraj Andekar : बहिणींनी दुपारी प्लॅन केला अन् रात्री भावाला संपवलं, आंदेकर हत्याकांडाची ए टू झेड माहिती
- Published by:Shreyas
Last Updated:
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक वनराज आंदेकर याचा खून त्याच्याच बहिणींनी आणि मेव्हण्यांनी मिळून केला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
वैभव सोनवणे, प्रतिनिधी
पुणे : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक वनराज आंदेकर याचा खून त्याच्याच बहिणींनी आणि मेव्हण्यांनी मिळून केला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मालमत्ता आणि संपत्तीच्या वादातून वनराजच्या बहिणींनी भावाला कायमच बाजूला करायचं ठरवलं. दुपारी बहिणींनी मिळून प्लॅन बनवला आणि रात्री वनराज वर गोळीबार तसंच कोयत्याने केलेल्या हल्ल्यात वनराजचा मृत्यू झाला. यासाठी त्यांनी मदत घेतली एकेकाळी आंदेकर टोळीचा शूटर आणि आता वैमनस्य असलेला सोमनाथ गायकवाडची.
advertisement
आंदेकर टोळीचा पुण्यात 40 वर्ष रक्तरंजित इतिहास आहे. बाळू, बंडू, उदय, रमाकांत हे आंदेकर टोळीचे गेल्या 40 वर्षातले प्रमुख म्होरके. यातल्या बाळू आंदेकर याचा 30 वर्षांपूर्वी खून झाला. आंदेकर कुटुंबाने राजकारणातही प्रवेश केला. आंदेकरांच्या घरात गेल्या 20 वर्षात वत्सला आंदेकर महापौर तर उदय आंदेकर लक्ष्मी आंदेकर, वनराज आंदेकर हे नगरसेवक म्हणून निवडून आले.
advertisement
दरम्यान बंडू आंदेकर हा टोळी चालवत होता. त्यांचा राजकारणाचा आणि गुन्हेगारीचा आलेख ही वाढतच राहिला. यातूनच आलेल्या वैमनस्यातून वनराज आंदेकर याचा खून झालाय. फक्त या वैमनस्यात यावेळी बहिणीच सहभागी झाल्यात. बहिणी आणि मेहुण्यांनी वनराजला संपवण्याचा दुपारी प्लान आखला आणि रात्री वनराजवर गोळीबार आणि मग कोयत्याने वार करून त्याला संपवण्यात आलं.
advertisement
का केली वनराजची हत्या?
एका भांडणामध्ये मध्यस्थी करून भांडण मिटवल्याच्या तसंच प्रॉपर्टी वरून झालेल्या वादातून बहिणींनी वनराजला संपवलं, त्यासाठी त्यांनी मदत घेतली आंदेकर टोळीचा आधीचा शूटर आणि आताचा कट्टर विरोधक सोमनाथ गायकवाडची.
याप्रकरणी वनराजच्या बहिणी संजीवनी जयंत कोमकर, जयंत कोमकर, कल्याणी गणेश कोमकर, गणेश कोमकर, सोमनाथ गायकवाड यासह इतर जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
advertisement
वनराज हे सुर्यकांत आंदेकर यांचे पुत्र तर, संजीवनी आणि कल्याणी या मुली आणि, जयंत आणि गणेश हे जावई आहेत. आरोपींनी वनराज विरोधात पोलिसात तक्रार दिली होती. प्रॉपर्टी आणि संपत्तीच्या वादावरून ही तक्रार देण्यात आली होती, यावेळी आरोपींनी वनराजला जिवे मारण्याची धमकी दिली होती. दुपारी बहिणींनी आणि मेव्हण्यांनी सोमनाथ गायकवाड याला सांगून वनराजला संपवण्याचा प्लॅन आखला.
advertisement
वनराज घरातून खाली किती वाजता येणार आहे? कुठे बसला आहे? कोणासोबत आहे याची मिनिट टू मिनिट माहिती कोमकर मारेकऱ्यांना देत होते. अखेर साडेआठ वाजता दुचाकीवरून आलेल्या दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने वनराज वर गोळीबार केला, यावेळी वनराज वर पाच गोळ्या झाडण्यात आल्या मात्र यातील दोनच त्याला लागल्या पण आरोपींनी अतिशय क्रूरपणे त्याच्यावर कोयत्याने वार केले आणि यात त्याचा मृत्यू झाला.
advertisement
या घटनेची गंभीर दखल पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी घेतली असून त्यांनी तात्काळ पोलीस आयुक्ता अमितेश कुमार यांना दोषींवर कठोर कारवाई केल्याच्या सूचना देखील दिल्या. वनराजच्या खुनाने पुन्हा एकदा टोळीयुध्द भडकण्यची शक्यता आहे. कुटुंबातील वाद आणि टोळीचं पूर्ववैमनस्य एकत्र आलं आणि वनराजचा गेम झालाय. 40 वर्ष आंदेकर टोळीने जे पेरल ते त्यांच्या कुटुंबावरच उलटतंय, आंदेकर टोळीच्या रक्तरंजित इतिहासाचा उत्तरार्ध आता सुरू झालाय.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
September 02, 2024 6:24 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Vanraj Andekar : बहिणींनी दुपारी प्लॅन केला अन् रात्री भावाला संपवलं, आंदेकर हत्याकांडाची ए टू झेड माहिती