दिवाळीत का साजरी केली जाते बलिप्रतिपदा? काय आहे अख्यायिका?
- Published by:News18 Marathi
 
Last Updated:
दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी कार्तिक प्रतिपदेला बलिप्रतिपदा सण साजरा केला जातो.
वर्धा, 12 नोव्हेंबर: दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी कार्तिक प्रतिपदेला बलिप्रतिपदा सण साजरा केला जातो. बलिप्रतिपदेला बली पूजा असेही म्हणतात, जी गोवर्धन पूजेसोबत येते. हा उत्सव भगवान श्रीकृष्ण आणि गिरीराज यांना समर्पित आहे. बलिप्रतिपदेला राजा बळीची पूजा करण्याची परंपरा आहे. बलिप्रतिपदा हा सण आपण नेमका का साजरा करतो ? यामागे काय आख्यायिका आहे? याबाबत वर्धा येथील जाणकार दर्शना पाकोजवार यांनी माहिती दिली आहे.
ही आहे आख्यायिका
एकदा भक्त प्रल्हादाचा नातू बळीराजा याने खूप मोठे यज्ञयाग करून देवांना प्रसन्न करून घेतले. तर इंद्राला मोठी चिंता लागली त्याला भय वाटायला लागले की हा बळीराजा आपलं इंद्रपद तर घेणार नाही? त्यामुळे इंद्र सर्व देवांना घेऊन भगवान विष्णूकडे गेले. ते विष्णूला शरण गेले आणि बळीराजापासून आमचं रक्षण करा म्हणू लागले. तेव्हा भगवान विष्णूंनी वामनाचे रूप धारण केले. तसेच त्याची परीक्षा घेण्यासाठी बळीराजाच्या राज्यात आले. बळीराजाच्या दारासमोर जाऊन उभे राहिले.
advertisement
बळीराजा हा दयाळू आणि दानी होता. त्याला ब्राह्मणांविषयी विशेष प्रेम होते. त्याने वामनाचे पाय धुतले आदरातिथ्य केलं. त्यांनी वामनाला विचारलं आपण कशासाठी आले आहात? वामन रूपात आलेल्या विष्णूने त्यांना सांगितले की मला तुझ्याकडून काही दान हवे आहे. तुझी दानाची आख्यायिका आम्ही सर्वत्र ऐकली आहे. बळीराजा म्हणाले ब्राह्मण देवता तुम्हाला जे हवे ते मागा. मी नाही म्हणणार नाही. तेव्हा विष्णूने वचन घेतल्यानंतर त्यांच्याकडे तीन पावले जमीन मागितली. बळीराजांनी त्याला होकार दिला.
advertisement
विष्णूनी पहिले पाऊल ठेवताच पूर्ण पृथ्वी व्यापून गेली. दुसरे पावलांमध्ये पूर्ण अंबर व्यापून गेले. आता तिसरा पाऊल कुठे ठेवू? म्हणून बळीराजाला विचारायला लागले. बळीराजा म्हणाला "भगवान तुमचं हे पाऊल माझ्या मस्तकावर ठेवा" म्हणून त्यांनी आपलं मस्तक वामनांच्या समोर झुकवलं. तसेच वामनाने बळीराजाच्या मस्तकावर पाऊल ठेवल्याबरोबर बळीराजा पाताळात गेले. पाताळात गेल्यावर विष्णूने त्यांना तिथले राज्य दिले. तिथले राजा बनवले आणि त्यांच्यावर प्रसन्न झाले. तेव्हा विष्णूने बळीराजाला आशीर्वाद दिला की आजपासून पृथ्वीवर तुझी पूजा केली जाईल. आणि तुझे हे महात्म्य बलिप्रतिपदा सणाच्या निमित्ताने सर्वांना कळेल. म्हणून आपण बलिप्रतिपदा हा सण साजरा करत असतो, असे पाकोजवार सांगतात.
advertisement
बलिप्रतिपदेबाबत इतर आख्यायिका
भगवान विष्णूने इंद्राचा अहंकार नाहीसा करण्यासाठी गोवर्धन पर्वताला करंगळीवर घेतले आणि सर्व गोपींचे, गाई गुरांचे रक्षण केले. म्हणून गाई गुरांचीही पूजा केली जाते. अशाप्रकारे या दिवशीच्या अनेक आख्यायिका सांगितल्या जातात, असे वर्धा येथील जाणकार दर्शना पाकोजवार सांगतात. बळीची पूजा करण्याची परंपरा फार पूर्वीपासून सुरू झाली. असे मानले जाते की राजा बळी या दिवशी पृथ्वीवर वास्तव्य करण्यासाठी येतो आणि भक्तांची हाक ऐकतो. त्यामुळे दिवाळीच्या दिवसांमध्ये बलिप्रतिपदा या सणाला देखील विशेष महत्त्व असतं.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view commentsLocation :
Wardha,Maharashtra
First Published :
November 12, 2023 11:10 AM IST

              