IPL 2025 : 4 आण्याची कोंबडी, 12 आण्याचा मसाला... सहीच्या नादात दिग्वेश राठीचा 'चेक बाऊन्स', किती पैसे गमावले?
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आयपीएल 2025 मध्ये लखनऊचा लेग स्पिनर दिग्वेश राठीवर एका मॅचची बंदी घालण्यात आली आहे. आयपीएलच्या या मोसमात दिग्वेश राठी त्याच्या सहीच्या सेलिब्रेशनमुळे बरेच वेळा वादात सापडला.
मुंबई : आयपीएल 2025 मध्ये लखनऊचा लेग स्पिनर दिग्वेश राठीवर एका मॅचची बंदी घालण्यात आली आहे. हैदराबादविरुद्धच्या सामन्यात अभिषेक शर्मासोबत मैदानात वाद झाल्यामुळे दिग्वेश राठीला मॅच फी चा 50 टक्के दंड आणि एक मॅचची बंदी घातली गेली. दिग्वेश राठीवर यंदाच्या आयपीएलमध्ये कारवाई व्हायची ही काही पहिली वेळ नाही. याआधीही विकेट घेतल्यानंतर सही केल्याच्या सेलिब्रेशनमुळे दिग्वेश राठीवर दंडात्मक कारवाई झाली आहे, पण यानंतरही दिग्वेश राठी सुधारत नसल्यामुळे त्याच्यावर एका मॅचची बंदी घालण्यात आली आहे.
पहिली कारवाई
दिग्वेश राठीवर पहिली कारवाई 1 एप्रिलला पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यावेळी झाली. पंजाबचा ओपनर प्रियांश आर्याची विकेट घेतल्यानंतर दिग्वेश राठीने सही करण्याचं सेलिब्रेशन केलं, त्यानंतर त्याच्यावर मॅच फी च्या 25 टक्के दंड आकारला गेला, त्यामुळे दिग्वेश राठीला 1,87,500 रुपये द्यावे लागले.
दुसरी कारवाई
4 एप्रिलला मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात नमन धीरची विकेट घेतल्यानंतरही दिग्वेश राठीने अशाचप्रकारे सेलिब्रेशन केलं, तेव्हा त्याच्याकडून 50 टक्के म्हणजेच 3,75,000 रुपयांचा दंड आकारला गेला.
advertisement
तिसरी कारवाई
19 मे रोजी हैदराबादविरुद्धच्या सामन्यात दिग्वेश राठीने अभिषेक शर्माची विकेट घेतली, त्यानंतर दोघांमध्येही भर मैदानात राडा झाला. अखेर अंपायरनी दिग्वेश आणि अभिषेकला बाजूला केलं. या सामन्यानंतर दिग्वेश राठीवर 50 टक्के दंड आणि एका मॅचची बंदी घालण्यात आली.
आयपीएलच्या या मोसमात दिग्वेश राठी याने 9,37,500 रुपये दंडाची रक्कम म्हणून दिले आहेत. लखनऊ सुपरजाएंट्सने आयपीएल लिलावात दिग्वेश राठीला 30 लाख रुपयांच्या बेस प्राईजवर विकत घेतलं. 15 डिसेंबर 1999 साली जन्मलेला दिग्वेश राठी दिल्लीकडून स्थानिक क्रिकेट खेळतो. 29 नोव्हेंबर 2024 ला सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेतून राठीने पदार्पण केलं, यानंतर काही दिवसांमध्येच राठीला लखनऊने आयपीएल लिलावात विकत घेतलं. आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात राठीने त्याच्या तिसऱ्याच बॉलला दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलची विकेट घेतली.
advertisement
लखनऊ सुपर जाएंट्सचं यंदाच्या मोसमातलं प्ले-ऑफचं आव्हान संपुष्टात आलं आहे, पण त्यांचे अजूनही दोन सामने शिल्लक आहेत. यातल्या 22 मे रोजी होणाऱ्या गुजरातविरुद्धच्या सामन्यात दिग्वेश राठी बंदीमुळे खेळू शकणार नाही, पण 27 मे रोजी आरसीबीविरुद्ध लखनऊच्या सामन्यात दिग्वेश पुन्हा मैदानात उतरेल. दिग्वेश राठी हा लखनऊचा यंदाच्या मोसमातला सगळ्यात यशस्वी बॉलर आहे. राठीने 12 सामन्यांमध्ये 8.18 चा इकोनॉमी रेट आणि 28.07 च्या सरासरीने 14 विकेट्स घेतल्या आहेत. 30 रनवर 2 विकेट ही दिग्वेश राठीची सर्वोत्तम कामगिरी आहे.
Location :
Lucknow,Uttar Pradesh
First Published :
May 21, 2025 5:50 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2025 : 4 आण्याची कोंबडी, 12 आण्याचा मसाला... सहीच्या नादात दिग्वेश राठीचा 'चेक बाऊन्स', किती पैसे गमावले?