Success Story : कोल्हापूरच्या पाटील बंधूंची कमाल, 3 एकरमध्ये फुलवली ड्रॅगन फळ बाग, एकरी 7 लाखांचा नफा, Video

Last Updated:

कोल्हापुरातील जयसिंग पाटील आणि प्रताप पाटील या सख्ख्या भावांनी ड्रॅगन फळाच्या शेतीतून लाखोंचे उत्पन्न मिळवत एक नवा आदर्श निर्माण केला आहे. पाटील बंधूंनी 3 एकर क्षेत्रावर ही शेती फुलवली असून, त्यांना यातून भरघोस नफा मिळत आहे.

+
News18

News18

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील साखरपट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात शेती क्षेत्रात नवं काहीतरी घडतंय. पारंपरिक ऊस शेतीला पर्याय म्हणून आधुनिक फळशेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. कमी वेळेत, कमी खर्चात आणि जास्त नफा देणाऱ्या पिकांचा शोध घेताना कोल्हापूर तालुक्यातील कांडगाव येथील जयसिंग पाटील आणि प्रताप पाटील या सख्ख्या भावांनी ड्रॅगन फळाच्या शेतीतून लाखोंचे उत्पन्न मिळवत एक नवा आदर्श निर्माण केला आहे. तैवान, व्हिएतनाम, थायलंडसारख्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादित होणाऱ्या ड्रॅगन फळाची लागवड आता कोल्हापूर, सांगली, सोलापूरच्या पट्ट्यात जोमाने वाढत आहे. पाटील बंधूंनी 3 एकर क्षेत्रावर ही शेती फुलवली असून, त्यांना यातून भरघोस नफा मिळत आहे.
पारंपरिक शेतीला फाटा, नव्या दिशेने प्रवास
पश्चिम महाराष्ट्रात ऊस शेती ही शेतकऱ्यांची पहिली पसंती राहिली आहे. मात्र, वाढता उत्पादन खर्च, पाण्याचा तुटवडा आणि कमी नफा यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर, पाटील बंधूंनी तीन वर्षांपूर्वी ऊस शेतीला पर्याय शोधण्याचा निर्णय घेतला. त्यांच्याकडे वडिलोपार्जित 8 एकर शेती आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आधुनिक शेती करण्यासाठी ते परिसरात प्रसिद्ध आहेत. ड्रॅगन फळाबद्दल सुरुवातीला त्यांना फारशी माहिती नव्हती. कमी शिक्षण असूनही त्यांनी हार न मानता माहितीचा शोध घेतला. सांगलीतील पाहुण्यांकडून त्यांना ड्रॅगन फळाच्या शेतीची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी या पिकाची लागवड करण्याचे ठरवले आणि यशस्वी प्रयोगाला सुरुवात केली.
advertisement
वैज्ञानिक दृष्टिकोन आणि नियोजन
जगभरात ड्रॅगन फळाच्या 153 जाती आहेत. कोल्हापूरच्या हवामानाचा आणि तापमानाचा सखोल अभ्यास करून पाटील बंधूंनी लाल रंगाच्या सी व्हरायटी ड्रॅगन फळाची लागवड करण्याचे ठरवले. त्यांनी हैदराबादहून दर्जेदार रोपे मागवली आणि 4 बाय 7 फूट अंतरावर ट्रेलीस पद्धतीने लागवड केली. ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करून पाण्याचा कार्यक्षम वापर केला. सेंद्रिय खत आणि पोल्ट्री खतांचा वापर करून त्यांनी सेंद्रिय शेतीवर भर दिला. लागवडीपासून वर्षभरानंतर त्यांना 350 ते 990 ग्रॅम वजनाचे उत्कृष्ट दर्जाचे ड्रॅगन फळ मिळू लागले. या फळांची चव, आकार आणि गुणवत्ता यामुळे बाजारात त्यांना विशेष मागणी मिळाली.
advertisement
बाजारपेठ आणि आर्थिक यश
पाटील बंधूंनी कोल्हापूरपासून मुंबई, हैदराबाद आणि देशभरातील बाजारपेठांमध्ये ड्रॅगन फळ विक्रीसाठी जाळे निर्माण केले. त्यांना किलोमागे 70 ते 150 रुपये भाव मिळाला. उत्पादन खर्च वजा जाता त्यांना एकरी सुमारे 7 लाखांचा नफा मिळाला. आता तिसऱ्या वर्षी पीक वाढत असून, गतवर्षीपेक्षा जास्त नफा मिळण्याची त्यांना खात्री आहे. सेंद्रिय पद्धतीने पिकणाऱ्या ड्रॅगन फळाला सध्या बाजारात मोठी मागणी आहे. विशेषतः आरोग्यवर्धक फळ म्हणून या फळाची लोकप्रियता वाढत आहे, ज्यामुळे पाटील बंधूंना भरघोस नफा मिळत आहे.
advertisement
ड्रॅगन फळाचे आरोग्यवर्धक फायदे
ड्रॅगन फळ हे केवळ चवीसाठीच नव्हे, तर आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर आहे. हे फळ त्वचेला नाजूकपणा आणि उजळपणा देते, डोळ्यांचे विकार कमी करते आणि चेतासंस्थेला बळकटी देते. हाडे मजबूत करण्यासोबतच हृदयविकारांवरही हे फळ उपयुक्त आहे. याशिवाय, प्रतिकारशक्ती वाढवणे, कॅन्सर प्रतिबंध आणि गर्भातील व्यंग टाळण्यासाठीही हे फळ फायदेशीर आहे. रक्तातील पेशी वाढवण्यासाठी डॉक्टरही याचा आहारात समावेश करण्याचा सल्ला देतात. या सर्व गुणांमुळे ड्रॅगन फळाला सध्यासुपरफूडम्हणून बाजारात मोठी मागणी आहे.
advertisement
प्रेरणादायी यश आणि भविष्यातील योजना
पाटील बंधूंनी बाजारपेठेची गरज आणि ग्राहकांची मागणी ओळखून ड्रॅगन फळाच्या शेतीत यश मिळवले आहे. त्यांचा हा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. कमी शिक्षण आणि मर्यादित संसाधनांनंतरही त्यांनी आधुनिक शेतीतून लाखोंचे उत्पन्न मिळवले, हे कोल्हापूरच्या शेती क्षेत्रासाठी एक नवे पर्व आहे. भविष्यात ते आपली शेती आणखी वाढवण्याचा आणि सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून अधिक बाजारपेठ काबीज करण्याचा विचार करत आहेत. याशिवाय, ते स्थानिक शेतकऱ्यांना ड्रॅगन फळाच्या शेतीबाबत मार्गदर्शन करण्यासही तयार आहेत.
advertisement
शेतकऱ्यांसाठी नवा मार्ग
कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक शेतकरी ड्रॅगन फळाच्या शेतीकडे आकर्षित होत आहेत. कमी पाणी, कमी देखभाल आणि जास्त नफा देणारे हे पीक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. पाटील बंधूंनी दाखवलेला हा मार्ग इतरांना प्रेरणा देत असून, कोल्हापूरच्या शेती क्षेत्रात नव्या क्रांतीची नांदी ठरत आहे.
मराठी बातम्या/कृषी/
Success Story : कोल्हापूरच्या पाटील बंधूंची कमाल, 3 एकरमध्ये फुलवली ड्रॅगन फळ बाग, एकरी 7 लाखांचा नफा, Video
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement