जमिनीचा अचूक पीएच जाणून घेण्यासाठी मृदा परीक्षण हा सर्वात खात्रीशीर मार्ग आहे. यासाठी शेतातील वेगवेगळ्या ठिकाणांहून 6 ते 8 इंच खोलीपर्यंतची माती गोळा करून कृषी विभागाच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी द्यावी. याशिवाय बाजारात उपलब्ध असलेले पीएच टेस्ट किट, डिजिटल पीएच मीटर किंवा काही मोबाईल ॲप्सच्या मदतीने प्राथमिक माहिती मिळू शकते. मात्र, प्रयोगशाळेतील तपासणी अधिक विश्वासार्ह मानली जाते.
advertisement
शेतात फवारणीची वेळ चुकवताय? थेट उत्पादनावर बसेल फटका, कृषी तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
जमिनीचा पीएच बिघडल्याची काही ठळक लक्षणे पिकांमध्ये दिसून येतात. पिकांची वाढ नीट न होणे, पाने पिवळी पडणे, फुले आणि फळधारणा कमी होणे, खतांचा अपेक्षित परिणाम न दिसणे ही पीएच असंतुलनाची प्रमुख चिन्हे आहेत. योग्य पीएच नसल्यास जमिनीत असलेली नत्र, स्फुरद, पालाश तसेच सूक्ष्म अन्नद्रव्ये पिकांना उपलब्ध होत नाहीत. परिणामी, उत्पादनावर मोठा परिणाम होतो.
आम्लीय जमीन म्हणजेच पीएच 6 पेक्षा कमी असल्यास जमिनीत आम्लतेचे प्रमाण जास्त असते. अशा जमिनीसाठी शेतीत चुना, डोलोमाइट किंवा शेती चुना योग्य प्रमाणात वापरणे फायदेशीर ठरते. यामुळे आम्लता कमी होऊन पीएच हळूहळू संतुलित होतो. दुसरीकडे क्षारीय जमीन (पीएच 8 पेक्षा जास्त) असल्यास जिप्समचा वापर करणे, सेंद्रिय खतांचा अधिक समावेश करणे, हिरवळीचे खत घेणे आणि पाण्याचा योग्य निचरा ठेवणे उपयुक्त ठरते.
पीएच दुरुस्ती करताना मृदा परीक्षण अहवालानुसारच उपाय करणे अत्यंत गरजेचे आहे. अति प्रमाणात चुना किंवा जिप्सम वापरल्यास जमिनीची सुपीकता कमी होण्याचा धोका असतो. शेणखत, कंपोस्ट आणि गांडूळ खताचा नियमित वापर केल्यास जमिनीची भौतिक आणि रासायनिक गुणवत्ता सुधारते. योग्य पीएच राखल्यास पिकांची वाढ चांगली होते, खतांचा पूर्ण उपयोग होतो आणि शेती उत्पादनात लक्षणीय वाढ होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होते.





