या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूंकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यानुसार एकूण 20 जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांनी दिली. तपासाची जबाबदारी सहायक पोलीस निरीक्षक योगेश गायकवाड यांच्याकडे देण्यात आली आहे.
advertisement
मुकुंदवाडी येथील रहिवासी पवन गिते (वय 20) याने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, त्याचा नातेवाईक शैलेश घुगे आणि विशाल खेत्रे, उत्कर्ष सोपारकर व गौरव वानखेडे यांच्यात वाद सुरू होता. या वादातून घुगे व त्याच्या मित्रांवर लाकडी दांड्यांनी मारहाण करण्यात आली. भांडण थांबवण्याचा प्रयत्न करत असताना विशाल खेत्रेने “यालाही पकडा… आताच बाहेर आलो आहे, पुन्हा काही दिवस आत जाईन, पण याचा शेवट करतो,” असे म्हणत थेट हल्ला केल्याचा आरोप पवनने केला आहे.
दरम्यान, विशाल येशू खेत्रे (वय 24, रा. अयोध्यानगर) याने दिलेल्या तक्रारीत वेगळाच दावा केला आहे. किरकोळ धक्क्यामुळे वाद वाढला आणि त्यानंतर शैलेश घुगे, पवन गिते व त्यांच्या तीन ते चार साथीदारांनी शिवीगाळ करत आपल्यावर मारहाण केली, असे त्याने म्हटले आहे. पवनने मानेवर चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो चुकवताना हाताच्या दंडाला इजा झाल्याचे विशालने सांगितले.
या संपूर्ण प्रकारामागे आकाशवाणी परिसरातील एका खाजगी क्लासमध्ये शिकणाऱ्या तरुणीशी संबंधित मैत्रीचा वाद असल्याचे तपासात समोर आले आहे. या कारणावरून दोन्ही बाजूंच्या तरुणांनी आपल्या ओळखीच्या गुंडांना बोलावले होते. कॅनॉट प्लेसमधील एका चहाच्या दुकानात तडजोडीसाठी सर्वजण एकत्र जमले होते. मात्र, तेथेच शाब्दिक वाद उफाळून आला. काहीजण निघून गेल्यानंतर रस्त्याच्या कोपऱ्यावर त्यांना अडवण्यात आले आणि त्यानंतरच हिंसक हाणामारीला सुरुवात झाली.






