तपोवन संस्थेचे अध्यक्ष सुभाष गवई यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरावतीच्या तपोवन परिसरात विदर्भ महारोगी सेवा मंडळ तपोवन ही संस्था कार्यरत आहे. इथं महात्मा गांधीजींचे विचार जपून समाजसेवा केली जाते. विदर्भ महारोगी सेवा मंडळ तपोवन संस्थेचे अध्यक्ष सुभाष गवई यांनी दिलेल्या माहितीनुसार, संस्कृत अभ्यासक परचुरे यांना कुष्ठरोग झाला असता महात्मा गांधीजींनी स्वतः सेवाग्राममध्ये त्यांची सेवा केली होती. तेव्हापासून त्यांनी हे कार्य निरंतर सुरू ठेवलं. मात्र पुढे ते कोण सांभाळणार याबाबत त्यांना चिंता होती.
advertisement
दुसरीकडे, त्याच काळात अमरावती येथील श्रीमती पार्वतीबाई पटवर्धन आणि शिवाजीराव पटवर्धन हेसुद्धा कुष्ठरोग्यांची सेवा करत होते. पार्वतीबाई पटवर्धन या पहिल्या महिला सत्याग्रही होत्या. त्यामुळे त्यांचे महात्मा गांधीजींशी चांगले संबंध होते. मग पटवर्धन दाम्पत्यानं गांधीजींनी केलेल्या कुष्ठरोग्यांच्या सेवेचा वसा हाती घेतला आणि 24 सप्टेंबर 1946 रोजी जगदंबा कुष्ठधाम ही संस्था सुरू केली, अशी माहिती त्यांनी दिली.
पुढे ते सांगतात की, 1950 साली जगदंबा कुष्ठधाम संस्थेचं नाव बदलून विदर्भ महारोगी सेवा मंडळ तपोवन असं करण्यात आलं. शिवाजीराव पटवर्धन म्हणजेच दाजी साहेब आणि त्यांच्या पत्नी तपोवन इथं वास्तव्यासाठी आले होते. ते शांतीकुंजमध्ये राहिले. त्यांचं निवासस्थान अजूनही तपोवनमध्ये आहे. त्यांनी वापरलेली गाडीसुद्धा याठिकाणी आहे.
या संस्थेत आजारी रुग्णांवर मोफत उपचार केले जातात. त्यांना कामसुद्धा दिलं जातं. चटई, लाकडी वस्तू, चप्पल इत्यादी बनवण्याचं काम ते करतात. या वस्तूंची विक्रीही केली जाते. तसंच मेळघाटमधील अनाथ, एकपाल्य मुलांना या संस्थेत शिक्षण, जेवण, उपचार मोफत दिले जातात. त्यांच्या राहण्याची सोयही केली जाते. असे विविध उपक्रम ही संस्था राबवते, अशी माहिती त्यांनी दिली.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे मानवता अजूनही या संस्थेत जपली जाते. याचेच उदाहरण म्हणजे संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुभाष गवई हे स्वतः दररोज सायंकाळी सर्व रुग्णांची स्वतः भेट घेतात. त्यांचे सुखदुःख जाणून घेतात. त्यांना आपल्या हाताने मायेचा घास भरवतात. यामुळे रुग्णांना तपोवन म्हणजे आपलं स्वतःचं घर आहे याची जाणीव होते.