15 मे 2025 रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील महसूल प्रशासनासाठी तयार केलेले परिपत्रक अत्यंत परिणामकारक ठरले. संचिका निपटारा जलद झाला, नागरिकांच्या तक्रारींवर तत्काळ प्रतिसाद मिळू लागला आणि प्रशासन अधिक लोकाभिमुख बनले. या यशस्वी अनुभवामुळे राज्य शासनाने ही कार्यपद्धती सर्व जिल्ह्यांत अमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement
या उपक्रमामुळे महसूल विभागातील कामकाज अधिक जलद आणि सुसंगत होणार असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकाराचे राज्यभर कौतुक होत आहे. अधिकारीवर्ग आणि लोकप्रतिनिधींनी जिल्हाधिकारी स्वामी यांचे अभिनंदन करत संभाजीनगर प्रशासनाने संपूर्ण राज्याला दिशा दाखवली अशी प्रतिक्रिया दिली आहे.
परिपत्रकातील महत्त्वाचे मुद्दे
मे महिन्यात काढलेल्या परिपत्रकात मंडळ अधिकारी आणि महसूल सहाय्यकांचे अधिकार स्पष्ट करण्यात आले. मंडळ कार्यालयांमध्ये नियमित उपस्थिती, कामकाजाचे ठराविक दिवस आणि जबाबदाऱ्यांचे स्पष्ट विभाजन यावर भर देण्यात आला. यामुळे तलाठी आणि तहसीलदारांमधील समन्वय सुधारला आणि प्रकरणांच्या निपटाऱ्यात गती आली.
राज्य शासनाच्या नव्या आदेशानुसार, सहा महिन्यांच्या आत सर्व जिल्हाधिकारी या कार्यपद्धतीचा आढावा घेणार आहेत. तसेच प्रत्येक मंडळ कार्यालयाला आपले सरकार केंद्र मंजूर करण्याची प्रक्रिया राबवली जाईल.
जिल्ह्याचा अभिमानाचा क्षण
महसूल प्रशासनात सुधारणा घडवणाऱ्या या उपक्रमामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा गौरव वाढला आहे. जिल्हाधिकारी स्वामी यांच्या प्रयत्नांमुळे केवळ प्रशासनात बदल झाला नाही, तर नागरिकांचा विश्वासही अधिक दृढ झाला आहे. शासनाने या कार्यपद्धतीला राज्यभर लागू करण्याचा निर्णय घेतल्यामुळे हा क्षण जिल्ह्यासाठी अभिमानाचा ठरला आहे.