मुंबईकरांसाठी आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे. पनवेल-बोरीवली-वसई या नव्या उपनगरीय रेल्वे मार्गाला अखेर मंजुरी मिळाली आहे. नागरिकांकडून गेल्या अनेक वर्षांपासून या मार्गाची मागणी केली जात होती. हा प्रकल्प मंजूर झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
advertisement
ही नवी रेल्वेमार्गिका पनवेलपासून सुरू होऊन बोरीवली आणि वसईमार्गे विरारपर्यंत जाणार आहे. एकूण 69.23 किलोमीटर लांबी असलेली ही लाईन स्वतंत्रपणे कार्यान्वित होणार आहे. सध्या सुरू असलेल्या पनवेल-दिवा-वसई मार्गाप्रमाणेच ही नवी लाईनदेखील वेगळी असेल. या प्रकल्पासाठी अंदाजे 12,710.82 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मुंबई शहरी वाहतूक प्रकल्प 3 ब (MUTP 3B) अंतर्गत हा खर्च उभारण्यात येणार आहे.
या नव्या कॉरिडॉरमुळे बोरीवली, वसई, पनवेल या मोठ्या नोड्समधील थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी वाढेल. परिणामी प्रवासाचा वेळ कमी होईल, प्रवाशांना गर्दीतून सुटका मिळेल आणि प्रवास अधिक सुलभ व कार्यक्षम होईल.
याशिवाय बदलापूर-कर्जत दरम्यान तिसरी लाईन व आसनगाव-कसारा दरम्यान चौथ्या लाईनचेही काम सुरू असून या संपूर्ण उपनगरीय रेल्वे सुधारणा प्रकल्पासाठी 14,907.47 कोटींचा खर्च केला जाणार आहे.