नवी मुंबई : तू काय फक्त जेवण बनवतेस, तू काय फक्त घरात असतेस, असं गृहिणीला अनेकदा ऐकावं लागतं. मात्र परिपूर्ण स्वयंपाक बनवणं, उत्तमरीत्या घर सांभाळणं यासारखं दुसरं कसब नाही. जी स्त्री व्यवस्थित घर सांभाळू शकते तिचं मॅनेजमेंटचं गणित चोख असतं असं म्हणतात. जे खरं आहे आणि याच कौशल्याच्या जोरावर आज कित्येक गृहिणी व्यावसायिक झाल्या आहेत. आपल्या हातची चव आणि विविध कलागुणांना त्या उत्पन्नाचं साधन बनवतात. विनया पाटीलदेखील यापैकीच एक.
advertisement
विनया पाटील या गेली 10 वर्षे अनेकजणांना घरचा डबा देण्याचं काम करतात. त्यांनी आपल्या घरातूनच हा व्यवसाय सुरू केला. त्याचवळी पोळीभाजी केंद्र सुरू करण्याचा विचार त्यांच्या मनात आला आणि घरून यासाठी पूर्ण पाठिंबा मिळाला. मग त्यांनी 'श्री सद्गुरू कृपा पोळीभाजी केंद्र' सुरू केलं. ऐरोली सेक्टर 8 मध्ये हे केंद्र आहे. इथं वरण, भात, पोळी, भाकरी, वांग्याची भाजी, बटाट्याची भाजी, भेंडीची भाजी, अळूवडी, व्हेज थाळी, इत्यादी स्वादिष्ट असे पोटभर शाकाहारी पदार्थ मिळतात. म्हणूनच ऐरोलीकरांकडून या पोळीभाजी केंद्राला चांगला प्रतिसाद मिळतोय.
हेही वाचा : 'इथले' छोले-भटुरे भलतेच फेमस! खाण्यासाठी लागतात मुंबईकरांच्या रांगा
सध्या विनया यांना त्यांची बहीण आणि मुलगा व्यवसायात मदत करतात. त्यांच्या पोळीभाजी केंद्रात वरण-भात 30 रुपयांना मिळतं, पोळी 10 रुपयांना आणि कोणतीही भाजी 50 रुपयांना मिळते. तर संपूर्ण व्हेज थाळी मिळते 100 रुपयांना. त्यात एका व्यक्तीचं पोट व्यवस्थित भरतं. जे घरापासून लांब राहतात. त्यांच्यासाठी घरगुती जेवण जेवण्याचा हा उत्तम पर्याय आहे. म्हणूनच इथं ग्राहकांची मोठी गर्दी असते.
व्यवसाय लहान असो किंवा मोठा असो, स्वतःचं काम सुरू करायचं असेल, तर त्याबाबत संपूर्ण माहिती असायला हवी. यासाठीच विनया यांनी सुरूवातीला 7 वर्षे एका महिलेकडे डबा देण्याचं काम केलं. मग त्यांनी स्वतः घरात 10 वर्षे हे काम केलं आणि मग आता महिन्याभरापूर्वीच श्री सद्गुरू कृपा हे पोळीभाजी केंद्र सुरू केलं आहे.
'सुरूवातीला मला हा व्यवसाय जमेल की नाही, याबाबत भीती वाटत होती, मात्र घरच्यांनी प्रचंड सपोर्ट केला. दुसऱ्यांच्या हाताखाली काम करताना आपल्याला हवं तसं काम करता येत नाही, म्हणूनच मी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. आता आमच्या पोळीभाजी केंद्रातील पदार्थ लोकांना खूप आवडतात', असं विनया पाटील यांनी सांगितलं. गृहिणीसुद्धा यशस्वीरीत्या व्यवसाय करू शकते हे त्यांनी दाखवून दिलं आहे.