जालना : उन्हाळा संपून काहीच दिवसांत नैऋत्य मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल. मान्सूनच्या आगमनाची चाहूल लागल्याने शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी सुरू केली आहे. बी-बियाण्याची खरेदी केल्यानंतर अनेकदा शेतकरी बियाण्यांची तशीच शेतात पेरणी करतात. मात्र, पेरणी करण्यापूर्वी बियाण्यांची उगवण क्षमता तपासणे अत्यंत आवश्यक असतं. कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना उगवण क्षमता तपासण्याची प्रात्यक्षिके गावी जाऊन करून दाखवत आहेत. तसेच प्रत्येक शेतकऱ्याने बियाण्यांची उगवण क्षमता तपासल्याशिवाय पेरणी करू नये, असं आवाहन देखील कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी बियाण्यांची उगवण क्षमता कशी तपासावी? याबद्दच जालन्याच्या कृषी सहाय्यक अंजना सोनवलकर यांनी माहिती दिली आहे.
advertisement
बियाण्यांची उगवण क्षमता कशी तपासावी?
आपल्या घरचे किंवा बाजारातून विकत आणलेले बियाणे उगवणक क्षमता तपासण्यासाठी रँडमली 100 दाणे निवडावेत. यानंतर गोणपाटाचा एक चौकोनी तुकडा कापून घ्यावा. त्याला थोडा वेळ पाण्यात भिजवत ठेवावे. यानंतर तो जमिनीवर अंथरून 100 दाणे दहा दहाच्या रांगेत ठेवावेत. दहा दाण्यांच्या 10 रांगा तयार झाल्यानंतर गोणपाटाला प्रत्येक रांगेची एक एक घडी व्यवस्थित घालावी. सर्व दहा घड्या घालून झाल्यानंतर त्याची व्यवस्थित सुरळी तयार होते. या सुरळीला दोन्ही बाजूंनी सुतळीने किंवा दोरीने बांधून घ्यावे ही सुरळी रांजण किंवा टाकीपासी ठेवावी आणि दररोज दोन वेळा त्यावर पाणी टाकावे. पाच ते सहा दिवसांनी सुरळी उकळून पहावी. 100 दाण्यांपैकी 70 किंवा त्यापेक्षा जास्त दाणे उगवले असल्यास हे बियाणे पेरणी योग्य असल्याचे समजले जाते, असं कृषी सहाय्यक अंजना सोनवलकर यांनी सांगितलं.
वर्षाकाठी झाडांचा 5 लाख खर्च, पाणी नसल्यामुळे शेतकऱ्याने फिरवला डाळिंबाच्या झाडांवर जेसीबी Video
बियाण्यांची उगवण क्षमता आवश्यक तपासावी
बियाण्यांची उगवण क्षमता तपासल्यानंतर आपल्याला बियाण्याच्या दर्जाबाबत माहिती मिळते. 70 टक्के पेक्षा अधिक उगवण क्षमता असल्यानंतरच शेतकऱ्यांना बियाणे पेरणीचा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात येतो. बियाण्यांची उगवण क्षमता तपासल्यानंतर शेतकऱ्यांचं होणारं संभाव्य नुकसान टळतं आणि दुबार पेरणीचे संकट देखील निर्माण होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपलं संभाव्य नुकसान टाळण्यासाठी बियाण्यांची उगवण क्षमता आवश्यक तपासावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.