जालना: भारतीय रेल्वेचे आधुनिकीकरण करण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करत आहेत. याच प्रयत्नांचा भाग म्हणून वंदे भारत ही संपूर्णपणे स्वदेशी बनावटीची ट्रेन देशातील अनेक शहरांमधून धावत आहे. मराठवाड्याला देशाची आर्थिक राजधानी मुंबईला जोडण्यासाठी जालना ते मुंबई ही वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आली आहे. आज 30 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतून हिरवा झेंडा दाखवल्यानंतर जालन्याहून वंदे भारत ट्रेन मुंबईसाठी रवाना झाली. आधुनिक सुख सुविधा असलेली वंदे भारत ट्रेन जालना तसेच मराठवाड्यातील प्रवाशांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरली आहे. या ट्रेनमध्ये कोणकोणत्या सुख सुविधा देण्यात आलेल्या आहेत ते पाहूया.
advertisement
सात तासात जालन्याहून मुंबईत
देशाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अयोध्या येथून 6 वंदे भारत तर दोन अमृत भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. यापैकी एक म्हणजे जालना मुंबई बंदे भारत ट्रेन होय. केवळ सहा तासांमध्ये छत्रपती संभाजी नगर येथून मुंबईला पोहोचणे यामुळे शक्य होणार आहे. तर जालना येथून सात तासात मुंबई काढता येणार आहे. संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी ही रेल्वे एक मैलाचा दगड सिद्ध होऊ शकते. अनेक अत्याधुनिक सुख सुविधा या रेल्वेमध्ये देण्यात आल्याने ही रेल्वे प्रवाशांचं विशेष आकर्षण ठरत आहे.
संभाजीनगरची लेक 'वंदे भारत' चालवणार, कोण आहे कल्पना धनावत?
कधी आहे वंदे भारत ट्रेन?
जालन्याहून मुंबईला धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला एकूण 8 डबे असतील. रविवार ते शुक्रवार अशी सहा दिवस ही ट्रेन जालन्याहून मुंबईला धावेल. शनिवारी मात्र मुंबईसाठी जालन्याहून ही ट्रेन नसेल. सकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी जालन्याहून रवाना झाल्यानंतर 11 वाजून 55 मिनिटांनी ही ट्रेन मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथे पोहोचेल.
कशी आहे वंदे भारत ट्रेन?
वंदे भारत एक्सप्रेस मध्ये असलेले दरवाजे हे स्वयंचलित प्रकारचे आहेत. त्याचबरोबर प्रवाशांना बसण्यासाठी अतिशय सुखदायी आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे. प्रवाशांच्या सीट जवळच त्यांना मोबाईल चार्जिंग करण्यासाठी स्टेशन देण्यात आले आहे. त्याचबरोबर या ट्रेनच्या विंडो देखील खूप मोठ्या असल्याने बाहेरचा व्ह्यू खूप चांगल्या पद्धतीने प्रवाशांना अनुभवता येणार आहे. प्रत्येक शीट जवळ आलार्म असून काही अडचण आल्यास हे बटन दाबल्यास ट्रेन थांबवता येऊ शकते.
प्रत्येक कोचमध्ये एक आपत्कालीन खिडकी असून काही समस्या उद्भवल्यास या खिडकीतून बाहेर पडता येते. त्याच पद्धतीने पूर्णपणे एसी असलेली ही ट्रेन आहे. या ट्रेनमध्ये असलेली टॉयलेटची व्यवस्था देखील अतिशय चांगल्या प्रकारची आहे. प्रत्येक कोच मध्ये भारतीय आणि पाश्चिमात्य अशा दोन्ही प्रकारच्या टॉयलेटची व्यवस्था करण्यात आलेली आहे. याचबरोबर प्रत्येक कोचमध्ये गरम आणि गार अशा दोन्ही प्रकारच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ट्रेनच्या प्रत्येक डब्यामध्ये एक एलईडी स्क्रीन लावण्यात आली असून यावर वेगवेगळे संदेश फ्लॅश होत राहतात.
जालना ते मनमाडपर्यंत या ट्रेनचा वेग 100 किलोमीटर एवढी असणार आहे. तर मनमाडहून मुंबई पर्यंत 130 किलोमीटर प्रति तास अशी गती या ट्रेनची असणार आहे. एकूणच मराठवाड्यातील प्रवाशांना अत्याधुनिक सुविधांनी युक्त अशी एक नवी ट्रेन अनुभवयास मिळणार आहे.