कोल्हापूर : कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील खड्डे हे नेहमीच गाजलेले समीकरण आहे. कोल्हापुरात रस्त्यात खड्डे आहेत की, खड्ड्यात रस्ते याचा नागरिकांना विचार करावा लागतो. कित्येकदा हे खड्डे चुकवण्याच्या नादात अपघातही झाले आहेत. मात्र आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे आता फक्त 72 तासांमध्ये नागरिकांना दुरुस्त करुन घेता येणार आहेत. त्यासाठी सा. बां. विभागाचे मोबाईल ॲप्लिकेशन कार्यान्वित करण्यात आले आहे. यावरून नागरीकांना घरबसल्या तक्रार नोंदवता येणार आहे.
advertisement
रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी शासनाकडून करोडो रुपयांचा निधी दिला जातो. मात्र काहीच दिवसात नव्याकोऱ्या रस्त्यावर देखील खड्डे पडतात आणि पुढे हे खड्डे कधीच नीट मुजवले जात नाहीत. त्यामुळे या रस्त्यांवरील खड्यांबाबत जनतेच्या मनात तीव्र भावना असतात. त्यामुळेच अशा खड्डे पडलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीची तक्रार आता नागरिकांना आपल्या मोबाईलवरून करता येणार आहे. त्यासाठी पीसीआरएस नावाचे अर्थात पोटहोल कम्लेंट रिड्रेसल सिस्टीम हे शासनाचे मोबाईल ॲप्लिकेशन कार्यान्वित करण्यात आले आहे. त्यामुळे आता नागरिकांना थोडे रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत समाधान मिळू शकते.
काय आहे ॲप्लिकेशनचा फायदा?
या ॲपवर नागरिकांना साबां विभागांतर्गत येणाऱ्या रस्त्यावरील खड्यांचा फोटो अपलोड करून तक्रार नोंदवल्यावर त्या रस्त्याची दुरुस्ती केली जाणार आहे. ही दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून फक्त 72 तासांमध्ये केली जाणार आहे. फोटो अपलोड केल्यानंतर त्या तक्रारीची स्थिती देखील संबंधित नागरिकाला ॲपवरच पाहता येणार आहे.
कुठून घेता येईल हे ॲप्लिकेशन ?
मोबाईलवर ॲप्लिकेशन स्टोअरमधून पीसीआरएस नावाचे ॲप नागरिकांना डाऊनलोड करता येते. आपला मोबाईल नंबर टाकून रजिस्ट्रेशन केल्यावर आपले प्रोफाईल ओपन करता येईल. यामध्ये (रजिस्टर फिडबॅक) तक्रार/अभिप्राय नोंदवणे आणि (ट्रॅक स्टेटस) स्थिती पाहणे असे दोन पर्याय मिळतात. यामध्ये आपल्या परिसरातील खड्ड्यांच्या फोटो सह तक्रार नोंदवता येते. तक्रार नोंदवल्यानवर सार्वजनिक बांधकाम विभागाला त्याबाबत नोटिफिकेशन मिळते. यावरून पुढे 72 तासांमध्ये तक्रारीचे निवारण केले जाते.
पुण्याच्या ट्रॅफिकमधून काढला मार्ग, आयटी इंजीनिअरचा भन्नाट प्रयोग, नेमकं काय केलं?
दरम्यान खड्डेमुक्त रस्ते बनवण्यासाठी नागरिकांच्या सहाय्याची देखील गरज भासते. त्यामुळे आपल्या परिसरात असणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आखत्यारित येणाऱ्या रस्त्यांवरील खड्ड्यांची तक्रार नोंदवण्याचे आवाहन सर्व नागरिकांना सा. बां. विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.