सांगली: सध्या सर्वत्र मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होतोय. या उत्सवात अनेक ठिकाणी सर्वधर्मीय बांधव सहभागी होतात. परंतु, सांगलीतील गोटखिंडीच्या गणेशोत्सवानं हिंदू-मुस्लिम ऐक्याचा अनोखा आदर्श निर्माण केला आहे. 44 वर्षांपूर्वी एका घटनेनं हिंदू-मुस्लिम बांधव एकत्र आले आणि त्यांनी थेट मशिदीतच गणपती बसवण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून आजतगायत येथील मशिदीत मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होतो. विशेष म्हणजे यामध्ये सर्व हिंदू-मुस्लिम बांधव एकत्रित सहभागी होतात.
advertisement
वाळवा तालुक्यातील गोटखिंडी येथे हिंदू आणि मुस्लिम बांधवांची वसती आहे. 1980 मध्ये येथील झुजार चौकात गणेशोत्सव साजरा होत होता. त्यावर्षी सर्वत्र मोठा पाऊस होता. त्यामुळे गावातील हिंदू-मुस्लिम बांधव एकत्र आले आणि निवाऱ्यासाठी गणपती मशिदीत बसवण्याचा निर्णय झाला. न्यू गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून आतापर्यंत 45 वर्षे झाले ही परंपरा गोटखिंडीतील दोन्ही धर्मीय बांधवांनी जोपासली आहे, अशी माहिती गणेश मंडळातील अशोक पाटील यांनी दिली.
गणपती बाप्पाने नेसली साडी, विनायकाच्या या अवतारामागील नेमकी कथा काय, VIDEO
हिंदू-मुस्लिम ऐक्याचा अनोखा आदर्श
आमचा मंडळामध्ये हिंदू समाजासह मुस्लिम समाजाचे शंभरहून अधिक सदस्य आहेत. आम्ही दोन्ही धर्मीय एकत्र येऊन आनंदाने गणेशोत्सव साजरा करतोय. गणेश उत्सवाच्या काळात मुस्लिम बांधवांचा सण आला तर आम्ही गणपतीसह मुस्लिम धर्मातील सण तितक्याच उत्साहाने साजरा करतो. हिंदू- मुस्लिम एकतेचा आमच्या गावचा आदर्श संपूर्ण देशाने घेण्यासारखा आहे, असंही पाटील यावेळी म्हणाले.
ईद आणि गणपती एकत्र
"1980 साली न्यू गणेश मंडळाची स्थापना झाली. यंदा 45 व्या वर्षी आम्ही मशिदीमध्ये गणपतीची प्रतिष्ठापना करून हिंदू- मुस्लिम एकतेची परंपरा जपली आहे. आम्ही दोन्ही समाजातील लोक लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत एकत्र येत आनंदाने गणपती उत्सव साजरा करतोय. यंदा गणपतीच्या काळात ईदचा सण आहे. परंतु आमच्या गावातील मुस्लिम बांधवांनी गणेश चतुर्थी पूर्वीच ईदला कुर्बानी देणार नसल्याचा निर्णय जाहीर केला आहे. केवळ नमाज पठाण करून आम्ही यंदाचा ईद साजरा करणार असल्याचं मुस्लिम बांधवांनी सांगितलं," अशी माहिती ॲड.अर्जुन कोकाटे यांनी दिली.
ना माती ना POP, इथं 77 वर्षांपासून पूजतात चंदनाची मूर्ती! पर्यावरणपुरक गणेशोत्सवाची अनोखी परंपरा
ही परंपरा पुढेही कायम
"45 वर्षांपासूनची आमची हिंदू- मुस्लिम एकत्रितपणे गणेश उत्सव साजरा करण्याची परंपरा आम्ही यापुढेही कायम ठेवणार आहोत. मशिदीमध्ये गणपतीची प्रतिष्ठापना करून आम्ही मुस्लिम बांधव मंडळामध्ये आरती पूजेसह सर्वच कामांमध्ये गुंतलेलो असतो. मुस्लिम समाजासोबत हिंदू धर्मीयांचे सण आम्ही नेहमीच आनंदाने साजरे करतो," असं मंडळाचे पहिले अध्यक्ष ईलाई पठाण यांनी सांगितले.