शहापूर तालुक्याच्या टेंभुर्ली गावात राहणाऱ्या देवराम रामू रन यांनी दारू पिऊन दारूच्या नशेत विहीरीत उडी मारून आत्महत्या केली होती.या घटनेची माहिती किन्हवली पोलिसांना मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत विहीरीतून मृतदेह काढण्याचा प्रयत्न सूरू केला होता. पण त्याचवेळी गावकऱ्यांनी एकत्र जमुन या पोलिसांच्या कामाला तीव्र विरोध केला होता.जो पर्यंत दारू विक्रेत्यावर कारवाई होत नाही तो पर्यंत विहीरीतून मृतदेह काढून देणार नाही अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतल्याने किन्हवली पोलिसांच्या नाकीनऊ आले होते.गावकऱ्यांचा विरोध पाहता शेवटी दारू विक्रीत्यांवर कारवाईला सुरुवात केल्यानंतर विहीरीतून मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी शहापूर उपजिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आला आहे.
advertisement
ग्रामपंचायत सदस्यांचा गंभीर आरोप
या प्रकरणात ग्रामपंचायत सदस्य मांजरे समाधान रावजी हिलम यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे. आज टेंभुर्ली कातकरी पाडा येथे देवराम रामू रण यांनी दारू पिऊन विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.या मृत्यूला सर्वस्वी जबाबदार पोलीस आहेत. कारण आम्ही वारंवार पोलिसांकडे दारूबंदी करण्याची मागणी केली होती. ग्रामपंचायतीत देखील ठराव घेऊन दारूबंदीची मागणी केली होती. पण पोलिसांनी याकडे सर्रास दुर्लक्ष केले होते.कदाचित यामधून पोलिसांना काही आर्थिक फायदा होत असेल,असा आरोप देखील त्यांनी केला होता. आजपर्यंत दारूमुळे 10 ते 15 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पोलीस अजून किती जणांचा जीव जाण्याची वाट पाहतात. जर पोलिसांनी कारवाई केली नाही तर आम्ही पोलीस ठाण्यात जाऊन मोर्चा काढू अशी भूमिका समाधान हिलम यांनी घेतली होती.