मुंबई: वरळी परिसरातील जपानी बुद्ध विहार हे मुंबईतील महत्त्वाचे बौद्ध धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळ आहे. बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी आणि बौद्ध अनुयायांसाठी हे विहार शांततेचं आणि प्रेरणादायी ठिकाण मानलं जातं. या विहाराची निर्मिती निचिरेन बौद्ध संप्रदायच्या मदतीने झाली असून, इथे दररोज पूजा, ध्यान आणि धार्मिक प्रवचनं आयोजित केली जातात. बुद्ध पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर या बौद्ध विहाराबाबत दिलीप अडांगळे यांनी माहिती दिलीये.
advertisement
बाबासाहेबांचं लग्न
मुंबईतील बौद्ध विहार हे ऐतिहासिक दृष्टीने देखील अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर दुसरं लग्न या विहारात संपन्न झालं होतं. 26 नोव्हेंबर 1948 रोजी बाबासाहेब आणि सविता आंबेडकर यांचं लग्न झालं. बाबासाहेबांनी त्यांच्या वैयक्तिक जीवनातील या नव्या पर्वाची सुरुवात याच पवित्र विहारात केली. या विवाह सोहळ्याला काही निवडक नातेवाईक आणि जवळचे सहकारी उपस्थित होते. सविता आंबेडकर या मूळच्या ब्राह्मण समाजातील असून त्यांचं मूळ नाव शारदा कबीर असं होतं. पेशाने डॉक्टर असणाऱ्या सविता यांनी बाबासाहेबांना मोलाची साथ दिली.
विहाराचे महत्त्व
जपानी बुद्ध विहारात बाबासाहेबांची नेहमीच ये-जा राहिली. त्यामुळे हे ठिकाण बौद्ध अनुयायांसाठी एक प्रेरणास्थान बनले आहे. विहाराच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत, येथे नियमितपणे पूजा, ध्यान आणि धार्मिक प्रवचनांचे आयोजन केले जाते.
या विहाराच्या स्थापनेत जपानी निचिरेन पंथाचे फुजी गुरुजी यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी 1931-38 दरम्यान भारतात येऊन भारतीय स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला आणि वरळी येथे बुद्ध विहार बांधले.
आजही या विहाराची देखभाल जपानच्या 'निप्पोन्झान म्योहोजी' संस्थेच्या भिक्खूंच्या मार्गदर्शनाखाली केली जाते. विहारात दररोज वंदना आणि पौर्णिमेचे कार्यक्रम आयोजित केले जातात.