मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी- चिंचवडमधील एका जिममध्ये शुक्रवारी सकाळी ९.२८ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. मिलिंद कुलकर्णी (वय ३७) असं मृत तरुणाचं नाव आहे. मिलिंद कुलकर्णी यांचा ह्रदयविकाराच्या धक्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
मिलिंद कुलकर्णी यांनी सहा महिन्यांपूर्वी चिंचवड गावामध्ये जिम जॉईंन केली होती. मिलिंद कुलकर्णी हे अधून-मधून ते जिमला जात होते. आज शुक्रवारी सकाळी ते नेहमी प्रमाणे जिमध्ये आले. आल्यानंतर थोडा व्यायाम केला. त्यानंतर थोडा ब्रेक घेऊन ते बाजूला बसले. पाणी प्यायलानंतर काही सेंकदात त्यांना अचानक भोवळ आली आणि ते खाली कोसळले. हा सगळा प्रकार जिममध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.
अचानक मिलिंद कुलकर्णी खाली कोसळल्याचं पाहून जिममध्ये व्यायाम करणारे इतर सहकारी धावून आले. त्यांनी मिलिंद कुलकर्णी यांना तातडीने नजिकच्या रुग्णालयात दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं. मिलिंद कुलकर्णी यांचा मृत्यू हृदविकाराच्या झटक्याने झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, मिलिंद कुलकर्णी यांच्या पत्नी डॉक्टर आहेत. मिलिंद कुलकर्णी यांच्या मृत्यूमुळे कुलकर्णी कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
