संघर्षातून उभ्या राहिलेल्या राधाबाई वाघमारे
राधाबाई वाघमारे यांचा विवाह 1957 साली झाला. विवाहानंतर पुण्यातील दापोडी परिसरातील वीटभट्टीवर एका छोट्याशा झोपडीत त्यांचा संसार सुरू झाला. आयुष्याच्या या प्रवासात त्यांना अनेक संकटांना सामोरं जावं लागलं. वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजुरांच्या जीवनातला संघर्ष त्यांनी त्यांच्या पुस्तकात मांडला आहे.
advertisement
राधाबाई वाघमारे यांनी जपून ठेवलेल्या आठवणी हे पुस्तक त्या एक ते दीड वर्षापासून लिहीत होत्या. या पुस्तकाचं प्रकाशन 28 सप्टेंबरला करण्यात आलं आहे. फक्त पाचवीपर्यंत शिक्षण झालेल्या राधाबाई यांनी सांगितलं की, मला लहानपणापासूनच वाचनाची खूप आवड होती. वेळ मिळाला की काहीतरी वाचत राहायचे. त्या वाचनातूनच माझ्या लेखनाला सुरुवात झाली. सुरुवातीला कविता लिहायला लागले, नंतर निबंध आणि इतर लेखही लिहू लागले.
राधाबाई वाघमारे यांनी ‘कविता स्त्रीवेदनेंच्या’ आणि ‘कविता छंद’ अशी अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या कवितांमधून स्त्रीच्या भावना, संघर्ष आणि जीवनातील वास्तवतेचं प्रभावी चित्रण दिसतं. त्यांच्या या पुस्तकांना आणि कवितांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. अलीकडेच त्यांनी ‘जपून ठेवलेल्या आठवणी’ हे आत्मकथनपर पुस्तक लिहिलं असून वाचकांकडून या पुस्तकाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या पुस्तकातून राधाबाई वाघमारे यांनी आपल्या जीवनप्रवासासोबतच कष्टकरी लोकांच्या आयुष्याचाही भावनिक आणि वास्तवदर्शी आलेख मांडला आहे.