मुंबई : राज्यामध्ये उन्हाचा कडाका कायम असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे उष्णतेत देखील वाढ झाली आहे. राज्यातील अनेक प्रमुख शहरांमधील कमाल तापमान 33 ते 36 अंश सेल्सियसच्या दरम्यान आहे. तर किमान तापमान 14 ते 21 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. फेब्रुवारी महिन्यातील तापमान हे सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता हवामान विभागाने आधीच वर्तवली आहे. 11 फेब्रुवारी रोजी राज्यातील हवामानाची स्थिती कशी असेल पाहुयात.
advertisement
मुंबई शहर आणि उपनगरात सकाळच्या वेळी धुके राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर आकाश निरभ्र होण्यास सुरुवात होईल. मुंबईतील कमाल तापमानात 1 अंशाने तर किमान तापमानात 2 अंशांनी घट होणार आहे. 11 फेब्रुवारी रोजी मुंबईतील कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस एवढे राहण्याची शक्यता आहे.
पुणे शहरामध्ये सामान्यतः निरभ्र आकाश राहण्याची शक्यता आहे. 10 फेब्रुवारीच्या तुलनेत पुण्यातील कमाल तापमान 1 अंशाने तर किमान तापमान 2 अंशांनी कमी होणार आहे. 11 फेब्रुवारी रोजी पुण्यातील कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 34 आणि 16 अंश सेल्सिअस एवढे राहील.
मराठवाड्यातील प्रमुख शहर असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये सामान्यतः निरभ्र आकाश राहील. तर 10 फेब्रुवारीच्या तुलनेत कमाल तापमान स्थिर राहणार असून किमान तापमानात 2 अंशांनी घट होणार आहे. संभाजीनगरमध्ये 11 फेब्रुवारी रोजी कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 16 अंश सेल्सिअस एवढे राहील. उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख शहर असलेल्या नाशिकमध्ये ही निरभ्र आकाश राहण्याची शक्यता आहे. 10 फेब्रुवारीच्या तुलनेत कमाल आणि किमान तापमानांमध्ये प्रत्येकी 1 अंशाने घट होणार असून कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस राहील.
विदर्भातील प्रमुख शहर असलेल्या नागपूरमध्ये मात्र कमाल आणि किमान तापमानामध्ये प्रत्येकी 1 अंशाने वाढ होण्याची शक्यता आहे. नागपूरमध्ये 11 फेब्रुवारी रोजी कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस एवढे राहणार आहे. तर नागपूरमध्ये सामान्यतः निरभ्र आकाश राहण्याची शक्यता आहे. एकंदरीत राज्यामध्ये उन्हाचा चटका कायम असून पुढील काही दिवस अशी स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.





