पुणे : नोकरी की व्यवसाय? असा प्रश्न विचारला तर अनेकजण कदाचित व्यवसाय म्हणतील. कारण त्यात स्वत:ची सत्ता असते. परंतु त्यात मेहनतही तेवढीच घ्यावी लागते यात काही शंका नाही. एक यशस्वी व्यवसायिक होण्यासाठी 9 ते 5च्या चौकटीबाहेरचा विचार आणि मेहनत करावी लागते. याचंच उत्तम उदाहरण म्हणजे चिंचवड भागातील वंदना पगार. आजकाल आपल्या वयाची पंचवीशी उलटली की, आता जरा शिक्षणातून ब्रेक घ्यावा असं वाटतं. पण त्यांनी वयाच्या पन्नाशीत ITIमधून शिक्षण घेऊन स्वत:चा मसाल्यांचा व्यवसाय सुरू केला. आज त्या हे मसाले 4 देशांमध्ये निर्यात करतात. शिवाय आता त्या याबाबत इतरांना प्रशिक्षणही देतात. पन्नाशीत त्या यशस्वी व्यावसायिक कशा झाल्या, जाणून घेऊया त्यांची यशोगाथा.
advertisement
आपली स्वत:ची वेगळी ओळख असावी असं प्रत्येकालाच वाटतं. वंदना यांचीसुद्धा हीच इच्छा होती. मग वयाचा, वेळेचा अजिबात विचार न करता त्यांनी आपलं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी काम करायला सुरूवात केली. ITI मध्ये प्रवेश घेऊन त्यांनी डिप्लोमा पूर्ण केला. त्यानंतर लाईट हाऊस एनजीओमधून एक कोर्स केला.
हेही वाचा : UPSC Preparation: अधिकारी व्हायचं असेल तर...! टॉपर आदित्य श्रीवास्तव यांच्या जबरदस्त टिप्स
वंदना यांनी सांगितलं की, 'मी आणि माझा मुलगा आम्ही रोज कॉलेजला जात होतो. तेव्हा माझं वय 50 होतं. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर काहीतरी सुरू करण्यापूर्वी अनुभव घ्यायला हवा असं वाटलं. तेव्हा एका मसाल्याच्या कंपनीत जवळपास 6 महिने काम केलं. तो अनुभव गाठीशी ठेवून 2017 साली 'मल्हार फूड्स' नावाने व्यवसाय सुरू केला. शिकत असताना, व्यवसाय सुरू करताना अनेकजणांनी टोमणे मारले. परंतु मी माझ्या विचारांवर ठाम होते. मला व्यवसायात माझी 2 मुलं खूप मदत करतात. मार्केटिंग, पॅकिंग, माल पोहोचवणं, इत्यादी कामं आधी आम्ही तिघंच करत होतो. आता 2 महिलांना सोबत घेऊन काम करतोय. हा व्यवसाय घरातूनच सुरू केला आणि आता घरातूनच काम करतोय.'
हेही वाचा : चक्क ATM मशीनमधून मिळतं दूध, तेही एकदम शुद्ध! पुणेकरांनी लावला शोध
दरम्यान, वंदना यांच्या कंपनीत एकूण 5 प्रकारचे मसाले तयार होतात. पुणेरी गोडा मसाला, चहा मसाला, कांदा-लसूण मसाला, काळा मसाला आणि मिरची पावडर. हे मसाले केवळ भारतातच नाही, तर जर्मनी, बोस्टन, जपान आणि कॅनडामध्ये निर्यात केले जातात. तसंच काही संस्थांना प्रशिक्षण देण्याचं कामही केलं जातं. त्यांनी आतापर्यंत 5 हजारांहून अधिक लोकांना प्रशिक्षण दिलंय. यामध्ये महिला आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तसंच त्यांना आतापर्यंत 16 हून अधिक पुरस्कारदेखील मिळाले आहेत. यशस्वी उद्योजिका वंदना पगार यांनी ही माहिती दिली.