पुणे : परंपरेतून आलेल्या मर्दानी खेळांना आधुनिक काळात जतन करण्याचे काम नितीन शेलार हे गेली अनेक वर्ष करत आहेत. लाठी, काठी, तलवारबाजी यांसारख्या युद्धकलेच्या माध्यमातून त्यांनी हजारो विद्यार्थ्यांचे शारीरिक आणि मानसिक बळ वाढवत त्यांना घडवले आहे. आजपर्यंत हजारो विद्यार्थी घडवणाऱ्या ‘शेलार मामा’यांचा प्रवास लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
मूळचे बारामतीचे आणि सध्या पुण्यातील धायरी भागात राहणारे नितीन शेलार हे गेली 19 वर्षे शिवकालीन पारंपरिक मर्दानी कलेचे प्रशिक्षण देत आहेत. आजवर त्यांनी सुमारे 38 ते 40 हजार विद्यार्थी घडवले आहेत. ‘राष्ट्रवीर गुरुकुल’ या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांमध्ये 37 शाखांद्वारे कार्य सुरू केले आहे.
advertisement
सिंहगडावर जाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, 1 जूनपासून नवे नियम, एक चूक पडेल महागात
शेलार यांच्या या प्रवासाची सुरुवात त्यांच्या आडनावामुळे झाली. ‘शेलार मामा’ अशी हाक दिली जात असल्याने लहानपणापासूनच त्यांना या कलेची ओढ निर्माण झाली. नंतर अॅड. किशोर पवार यांच्याकडे व्यायाम शिकण्यास सुरुवात केली आणि लाठी, काठी, दांडपट्टा, तलवार, ढाल यासारखे पारंपरिक शस्त्रकलेचे प्रशिक्षण घेतले. या क्षेत्रात गती आल्यावर त्यांनी स्वतःच प्रशिक्षण देण्याचे ठरवले.
राष्ट्रवीर गुरुकुलमध्ये विनाशस्त्र युद्धकला, भारतीय पारंपरिक व्यायामशैली, लाठीकाठी, तलवारबाजी, ढाल-तलवार, दणपट्टा, भाला, विट्टापा, बाणा यांसारख्या विविध मर्दानी खेळांचे प्रशिक्षण दिले जाते. आज समाजात वाढत्या गुन्हेगारी आणि असुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर ही कला आत्मसंरक्षणासाठी अत्यंत आवश्यक ठरत आहे, असे शेलार सांगतात.
सध्या पुणे, मुंबई, नाशिक, गडचिरोली, सातारा यांसारख्या ठिकाणी हे प्रशिक्षण दिले जात असून, 5 वर्षांच्या मुलांपासून ते 70 वर्षांपर्यंतचे नागरिक यामध्ये सहभागी होत आहेत. नितीन शेलार यांचा हा उपक्रम केवळ शारीरिक तंदुरुस्तीपुरता मर्यादित न राहता, शिस्त, आत्मविश्वास आणि संस्कार रुजवणारा प्रभावी सामाजिक उपक्रम ठरत आहे.