शहराची जीवनवाहिनी सर्वाधिक प्रदूषित
शहराची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी पवना नदी सर्वाधिक प्रदूषित असल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे. या नदीच्या पात्रात जैविक ऑक्सिजनची मागणी (BOD) 20.1 ते 30 मिग्रॅ/लि. इतकी आढळली असून, काही ठिकाणी ती तब्बल 31 मिग्रॅ/लि. पर्यंत पोहोचली आहे. 2022 च्या अहवालात पवना नदीचा सर्वाधिक BOD स्तर 26 मिग्रॅ/लि. नोंदवला गेला होता, म्हणजेच गेल्या काही वर्षांत प्रदूषणात तब्बल 5 मिग्रॅ/लि. वाढ झाली आहे. इंद्रायणी नदीतही परिस्थिती चिंताजनक असून, तिच्या पाण्यात 10.1 ते 20 मिग्रॅ/लि. इतका BOD स्तर नोंदवण्यात आला आहे.
advertisement
‘बीओडी’ म्हणजे काय?
‘बीओडी’ म्हणजे बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड (Biochemical Oxygen Demand). हे पाण्यातील प्रदूषणाचे प्रमाण ओळखण्यासाठी वापरले जाणारे एक महत्त्वाचे मानक आहे. पाण्यात सांडपाणी, औद्योगिक कचरा किंवा सेंद्रिय पदार्थ मिसळल्यास, त्या पदार्थांचे विघटन करताना जीवाणू आणि सूक्ष्मजीव ऑक्सिजनचा वापर करतात. या प्रक्रियेदरम्यान पाण्यातील ऑक्सिजनची मागणी वाढते, त्यालाच ‘बीओडी’ म्हणतात. पिण्यायोग्य पाण्यासाठी बीओडीचे प्रमाण 1 मिग्रॅ/लि. पेक्षा कमी असावे, तर स्नान आणि जलचरांच्या जीवनासाठी ते 3 मिग्रॅ/लि. पेक्षा कमी असणे आवश्यक आहे. बीओडीचे प्रमाण 3 मिग्रॅ/लि. पेक्षा जास्त झाल्यास त्या पाण्याचे प्रदूषण वाढलेले मानले जाते.
कमी प्रदूषित नद्यांच्या श्रेणीत शहरातील नद्यांचा समावेश करण्यासाठी आम्ही महापालिकेच्या सहकार्याने प्रयत्नशील आहोत. यासाठी अधिकाधिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यावर भर दिला जात आहे, अशी माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी मंचक जाधव यांनी दिली.