IAS होण्याचं स्वप्न पाहिलं अन् खासगी नोकरी सोडली, वाचा इंजिनिअर आयुषी जैन यांची प्रेरणादायी कहाणी
- Published by:News18 Marathi
- trending desk
Last Updated:
दोनवेळा अपयश आल्यानंतरही निराश न होता, पुन्हा ही परीक्षा दिली, व यश मिळवलं. चला तर, आयएएस आयुषी जैन गुरधानी यांच्या प्रेरणादायी प्रवास जाणून घेऊ.
मुंबई : प्रत्येक यशामागे संघर्षाचे विविध टप्पे असतात. केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीमार्फत दरवर्षी आयएएस, आयपीएस, आयएफएस यासह भारतातील नागरी सेवांमधील विविध महत्त्वाच्या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड करण्यासाठी नागरी सेवा परीक्षा घेतली जाते. या परीक्षेत यशस्वी होण्याचं स्वप्न अनेकाचं असतं. पण ते स्वप्न पूर्ण करणाऱ्यांचं प्रमाण खूपच कमी आहे. या परीक्षेत अपयश आल्यानंतर अनेकजण दुसरा मार्ग स्वीकारतात. पण आयुषी जैन गुरधानी यांनी यूपीएससीमध्ये दोनवेळा अपयश आल्यानंतरही निराश न होता, पुन्हा ही परीक्षा दिली, व यश मिळवलं. चला तर, आयएएस आयुषी जैन गुरधानी यांच्या प्रेरणादायी प्रवास जाणून घेऊ.
छोट्या शहरापासून सुरुवात
छोट्या शहरात असणाऱ्या सोयीसुविधा बघता तेथून आल्यानंतर एखादं मोठं उद्दिष्टं गाठणं सोपं नसते. असा प्रवास अनेक अडचणी आणि आव्हानांनी भरलेला असतो. पण अशा प्रवासात येणाऱ्या अडचणींना घाबरून न जाता ध्येयाकडे वाटचाल केली पाहिजे. आयुषी जैन गुरधानी यांनी हे दाखवून दिलं आहे. मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यातील सिरोंज या छोट्या शहरातील मुलीने स्वतःचं आयएएस अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जो काही संघर्ष केला, तो इतरांसाठी प्रेरणादायी असाच आहे.
advertisement
वडिलांचे किराणा दुकान
आयुषी यांच्या वडिलांचे किराणा दुकान आहे. आई गृहिणी आहे. आयुषी या सुरुवातीपासूनच अभ्यासात हुशार होत्या. त्यांना 10 वी मध्ये 91.2 टक्के आणि 12 वी मध्ये 90.4 टक्के गुण मिळाले होते. त्यानंतर त्यांनी भोपाळ येथील लक्ष्मी नारायण कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजीमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये इंजिनीअरिंग केलं. यामध्ये त्यांचा सीजीपीए 8.68 होता.
advertisement
खासगी नोकरी सोडून यूपीएससीची तयारी
बी. टेकची डिग्री मिळवल्यानंतर आयुषी यांनी एका कंपनीत डेटा सेंटर अॅडमिनिस्ट्रेटर म्हणून दोन वर्षे काम केलं. मग त्यांनी सरकारी नोकरीसाठी यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. नोकरी सोडून त्या 1 वर्ष दिल्लीत राहिल्या व यूपीएससी तयारीसाठी कोचिंग सुरू केलं. त्यानंतर 2017 मध्ये त्यांनी प्रथमच यूपीएससी परीक्षा दिली. मात्र, पहिल्या प्रयत्नात त्यांना प्रिलिम्स परीक्षाही उत्तीर्ण होता आलं नाही.
advertisement
दोनदा अपयश येऊनही सुरू ठेवली तयारी
पहिल्याच प्रयत्नात अपयशी ठरल्यानंतर आयुषी यांनी परीक्षेची तयारी करण्याची स्वतःची रणनीती बदलली. त्याचा फायदा असा झाला की 2018 मध्ये त्यांनी प्रिलिम्स परीक्षा उत्तीर्ण केली. मात्र, त्या मुख्य परीक्षेत यशस्वी होऊ शकल्या नाहीत. दोनदा अपयश आल्यानंतर त्या थोड्या निराश झाल्या, पण त्यानंतरही हार न मानता त्यांनी पुन्हा परीक्षेची तयारी सुरू केली. 2019 मध्ये प्रिलिम्स उत्तीर्ण झाल्यानंतर, त्यांनी त्यांचा ऑप्शनल विषय हा गणिताऐवजी एंथ्रोपोलॉजी हा घेतला.
advertisement
Success Story : वडिलांचं छोटसं किराणा दुकान, मुलगी आधी इंजिनियर नंतर आयएएस; असा आहे यशाचा फॉर्म्युला
2019 मध्ये मिळालं यश
ऑप्शनल विषय बदलल्यानं आयुषी यांना परीक्षेची तयारी करणे सोपं गेलं. पहिल्या दोन प्रयत्नांत झालेल्या चुकांमधून शिकून त्यांनी नवी रणनीती आखली. वृत्तपत्र वाचनाची सवय त्यांना यूपीएससी प्रिलिम्स, मेन आणि इंटरव्ह्यूमध्ये खूप फायदेशीर ठरली. 2019 मध्ये झालेल्या यूपीएससी परीक्षेत त्यांना 41 वी रँक मिळाली, व त्या आयएएस अधिकारी झाल्या.
advertisement
आसाममध्ये आहेत कार्यरत
आयुषी जैन गुरधानी सध्या आसाममधील शिवसागर जिल्ह्यातील नाझिरा शहरात उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. दिल्ली येथे झालेल्या जी 20 परिषदेत त्यांनी जागतिक बँकेच्या टीमसोबत संपर्क अधिकारी म्हणून काम केलं. यूपीएससीच्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांना कोविड लॉकडाउनच्या सकारात्मक परिणामाबद्दल विचारण्यात आलं होतं. यावर त्यांनी प्रत्युत्तर दिलं होतं की, प्रत्येक स्तरावर प्रदूषण लक्षणीयरीत्या कमी झालं आहे.
Location :
Delhi
First Published :
October 07, 2023 3:51 PM IST
मराठी बातम्या/करिअर/
IAS होण्याचं स्वप्न पाहिलं अन् खासगी नोकरी सोडली, वाचा इंजिनिअर आयुषी जैन यांची प्रेरणादायी कहाणी