'15-17 वर्ष मुंबईत राहता, लाज वाटली पाहिजे...' मनसेच्या रडारवर आला कपिल शर्मा, नेमकं काय झालं?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Kapil Sharma : अभिनेता कपिल शर्मा आणि त्याचा शो मनसेच्या रडारवर आला आहे. मनसे नेते अमेय खोपकर यांनी कपिल शर्माल इशारा दिला आहे.
मुंबई : अभिनेता आणि कॉमेडियन कपिल शर्मा काही दिवसांपासून चर्चेत आहे. कपिल शर्माच्या कॅफेवर झालेल्या गोळीबारानंतर तो चर्चेत आला होता. दरम्यान ते प्रकरण शांत झालेलं असताना कपिल शर्मा आता मनसेच्या रडारवर आला आहे. मनसे चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी कपिल शर्मा आणि त्याच्या शोवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
अमेय खोपकर यांनी प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा यांच्या शोमध्ये मुंबई शहराचा उल्लेख 'बॉम्बे' असा होण्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 30 वर्षांपूर्वी मुंबईचे नाव बदलले गेले तरीही हिंदी चित्रपट, ओटीटी प्लॅटफॉर्म आणि कपिल शर्मा शोमध्ये अजूनही 'बॉम्बे' हा शब्द वापरला जातोय, असा आरोप करत खोपकर यांनी इशारा दिला आहे. जर हे बदलले नाही तर शोचे शूटिंग बंद पाडण्याची धमकीही त्यांनी दिली आहे.
advertisement
कपिल शर्मा यांचा 'द कपिल शर्मा शो' हा देशभरात लोकप्रिय कॉमेडी शो आहे. या शोमध्ये मुंबई शहराचा उल्लेख 'बॉम्बे' असा केला जातो यावर मनसेने आक्षेप घेतला आहे. झी 24 शी बोलताना अमेय खोपकर म्हणाले, "कपिल शर्मा शो असो किंवा हिंदी सिनेमांत असो किंवा ओटीटी प्लॅटफॉर्मवर असो मुंबईचा उल्लेख जाणूनबुजून 'बॉम्बे' असा केला जातो. चेन्नई किंवा बंगळुरू बोलताना मात्र नीट नाव घेतले जाते. हे आम्हाला मान्य नाही."
advertisement
त्यांनी सांगितले की, मनसेने कपिल शर्मा शोच्या टीमला पत्र दिले आहे आणि आता ट्विटरवरही इशारा दिला आहे. जर बदल झाला नाही तर शोच्या शूटिंग स्पॉटवर जाऊन आंदोलन करणार आणि शूटिंग बंद पाडणार, अशी धमकी खोपकर यांनी दिली.
30 वर्षांनंतरही जुने नाव
मुंबईचे नाव 'बॉम्बे' वरून 'मुंबई' असे बदलले गेले. पण बॉलिवूड चित्रपटांमध्ये अजूनही 'बॉम्बे' हा शब्द सर्रास वापरला जातो, असा आरोप अमेय खोपकर यांनी केला आहे. त्यांनी कपिल शर्माला देखील धारेवर धरलं. ते म्हणाले, "15 ते 17 वर्षांपासून कपिल शर्मा मुंबईत राहतो तरी त्याला शहराचे नाव नीट घेता येत नाही का? बाहेरून आलेल्या लोकांना मुंबईत काम मिळते पण शहराचे नाव चुकीचे घेतात. त्यांना शरम वाटली पाहिजे. उद्या आम्ही कपिलला 'टपिल' म्हणू तर ते चालेल का? मनसेचा कपिल शर्मा किंवा बॉलिवूडला विरोध नाही, पण शहराच्या नावाचा आदर करावा. "
advertisement
#BombaytoMumbai
बॉम्बेचे मुंबई अधिकृत नामकरण होऊन ३० वर्षे झाली तरी अजूनही बॉलिवूड मधील कपिल शर्मा शो यात सेलिब्रिटी गेस्ट, दिल्लीस्थित राज्यसभा खासदार, शो अँकर आणि अनेक हिंदी चित्रपटात सर्रास बॉम्बे हा उल्लेख होत आहे. १९९५ महाराष्ट्र शासन व १९९६ मध्ये केंद्र शासनाची अधिकृत… pic.twitter.com/KKa7TazDJ0
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) September 11, 2025
advertisement
सेन्सॉर बोर्डावर टीका
अमेय खोपकर यांनी सेन्सॉर बोर्डावरही टीका केली आहे. ते म्हणाले, "मला सेन्सॉर बोर्डाला विचारायचं आहे की तुम्ही इतर वेळेला मराठी चित्रपटांना टार्गेट करता. एका मराठी सिनेमाच्या वेळी नामदेव ढसाळ कोण असा प्रश्न सेन्सॉर बोर्डाने विचारला. नामदेव ढसाळ माहिती नाही, अशी लोक तिथे बसली आहे. आणि इथे बॉम्बेचा उल्लेख ज्यावेळेस होतो त्यावेळेस ते आक्षेप घेत नाही. याचा विरोध सर्व स्थरातून झाला पाहिले. सगळ्यांनी लोकांनी याचा विरोध केला पाहिजे."
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 11, 2025 12:27 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'15-17 वर्ष मुंबईत राहता, लाज वाटली पाहिजे...' मनसेच्या रडारवर आला कपिल शर्मा, नेमकं काय झालं?