अजित दादांसाठी भावुक झाला रितेश देशमुख, Bigg Boss सोडून पोहोचला बारामतीत, पाहा VIDEO
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Riteish Deshmukh in Ajit Pawar Funeral : अजित दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी राजकीय क्षेत्रासोबतच कला, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. अभिनेता रितेश देशमुखही दादांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचला.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर बारामतीतील विद्या प्रतिष्ठान कॉलेजच्या प्रांगणात अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. 28 जानेवारी रोजी अजित पवार यांचं बारामतीमध्ये विमान अपघातात निधन झालं. महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचं स्थान असलेल्या अजित पवार यांच्या अंतिम निरोपासाठी देशभरातून नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. बारामतीत आज भावनांनी भरलेलं वातावरण पाहायला मिळत असून, प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू आणि मनात हळहळ आहे.
अजित दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी राजकीय क्षेत्रासोबतच कला, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. अभिनेता रितेश देशमुखही दादांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचला. रितेश सध्या 'बिग बॉस मराठी 6' च्या शूटिंगमध्ये बिझी आहे. तरी त्याने वेळ काढत अजित पवार यांच्या अंत्यदर्शनासाठी बारामतीत उपस्थिती लावली. शूटिंगच्या धावपळीतून थेट बारामतीत येत त्याने दादांच्या शेवटची अखेरची भेट घेतली.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी 'बिग बॉस मराठी 6' मध्ये 'भाऊचा धक्का' या विशेष एपिसोडचं शूटिंग होणार आहे. मात्र शूटिंग सुरू होण्याआधीच रितेश देशमुख बारामतीत पोहोचला. अजित दादांना पुष्पचक्र वाहून त्याने अंत्यदर्शन घेतलं आणि श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी रितेश अत्यंत भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.
रितेश देशमुख आणि अजित पवार यांच्यातील आपुलकीचं नातं अनेकांना माहीत आहे. सामाजिक आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही रितेश अनेकदा अजित दादांबद्दल आदर व्यक्त करताना दिसला आहे. त्यामुळेच, आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून अंत्यसंस्काराला हजेरी लावली.
advertisement
अजित दादांच्या निधनाची माहिती मिळाल्यानंतर रितेशनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. त्याने म्हटलं, "अजित दादांना एका दुर्दैवी अपघातात गमावल्याची बातमी ऐकून धक्का बसला. हृदय हेलावून गेलं आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक गतिमान नेत्यांपैकी ते एक होते. कामात हलगर्जीपणा त्यांना अजिबात मान्य नव्हता आणि त्यांच्या आजूबाजूच्या प्रत्येकाला उत्तम काम करण्यासाठी ते सतत प्रेरित करायचे. ते कधीही शब्द मोजून बोलले नाहीत. त्यांचा हजरजबाबीपणा अप्रतिम होता आणि संपूर्ण राज्याचं त्यांच्यावर भरभरून प्रेम होतं."
advertisement
रितेशनं पुढे लिहिलंय, "त्यांचं अकाली जाणं ही अतिशय मोठी हानी असून त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे. त्यांच्याशी अनेक वेळा संवाद साधण्याचा मला योग आला होता आणि त्यांनी माझ्यावर केलेल्या प्रेमळ वागणुकीसाठी ते माझ्या कायम आठवणीत राहतील. पवार कुटुंबीय, त्यांचे जवळचे आणि कोट्यवधी समर्थक यांच्याप्रती माझ्या मनापासून संवेदना."
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 29, 2026 12:34 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
अजित दादांसाठी भावुक झाला रितेश देशमुख, Bigg Boss सोडून पोहोचला बारामतीत, पाहा VIDEO










