Uddhav Thackeray Raj Thackeray : राजसोबत युती झाली तर कोणाची सत्ता? ठाकरे गटाच्या सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Uddhav Thackeray Raj Thackeray Alliance : युतीबाबत संभ्रम असताना ठाकरे गटाने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी केलेल्या सर्वेक्षणात महत्त्वाची आकडेवारी समोर आली आहे.
मुंबई: आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्र येणार की नाही, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून राज यांना युतीसाठी साद घातली जात आहे. तर, दुसरीकडे अजूनही मनसेने आपली भूमिका जाहीर केली नाही. इगतपुरी येथील पक्षाच्या शिबिरातही मराठी विजय मेळावा हा राजकीय युती नसल्याचे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले. त्यामुळे युतीबाबत संभ्रम आहे. अशातच ठाकरे गटाने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी केलेल्या सर्वेक्षणात महत्त्वाची आकडेवारी समोर आली आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सगळ्याच राजकीय पक्षांनी कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. भाजपकडून यंदा मुंबई सर करण्यासाठी कसोशीने प्रयत्न होत असून शिंदे गटाचीदेखील साथ आहे. तर, दुसरीकडे मुंबईतील सत्ता कायम ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे देखील प्रयत्नशील आहेत. या निवडणुकीत मनसे महत्त्वाची जबाबदारी पार पाडणार असल्याचा अंदाज राजकीय वर्तुळात आहे. मनसेला सोबत घेत मराठी मतांची फाटाफूट टाळण्यासाठी उद्धव प्रयत्नशील असल्याचे चित्र आहे. आगामी राजकीय व्यूहरचनेसाठी आता ठाकरे गटाकडून अंतर्गत सर्वेक्षण करण्यात आले असल्याचे वृत्त एका वृत्तपत्राने दिले आहे.
advertisement
शिवसेना ठाकरे गटाने आपल्या स्थानिय लोकाधिकार समिती आणि खासगी एजन्सीच्या माध्यमातून महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वेक्षण केले. संभाव्य युतीच्या ताकदीचा अंदाज घेण्याचा प्रयत्न यातून करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जर एकत्र आले, तर ही ठाकरे बंधूंची युती मुंबईत 100 हून अधिक जागा जिंकू शकतात, असा अंदाज या सर्वेक्षणातून समोर आला आहे. तर मनसेला 25 हून अधिक जागांवर विजय मिळू शकतो, असंही सर्वेक्षणात समोर आले आहे.
advertisement
स्वतंत्र लढल्यास काय होईल?
या सर्वेक्षणानुसार, ठाकरे बंधू वेगवेगळे लढल्यास दोघांनाही त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. मनसे स्वतंत्र लढल्यास त्यांना शून्य ते एक आकडीच जागा जिंकण्याचा अंदाज आहे. तर, ठाकरे गटाला 60-65 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुंबई महापालिकेत सत्ता राखणे अवघड होणार आहे.
मागील निवडणुकांमधील कामगिरी काय?
advertisement
2012 च्या पालिका निवडणुकीत शिवसेनेने 75, भाजपने 31 तर मनसेने 28 जागा जिंकल्या होत्या. 2017 मध्ये शिवसेना आणि भाजप स्वतंत्रपणे लढले. त्या वेळी शिवसेना 84, भाजप 82 आणि मनसे केवळ 7 जागांवर विजयी झाले. आता, शिवसेनेत फाटाफूट झाली आहे. एकनाथ शिंदे यांनीदेखील मुंबईत प्रभावी कामगिरी करण्यासाठी कंबर कसली आहे.
मराठी मतांचे समीकरण
advertisement
मुंबईत मराठी मतदार हा शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो. मात्र, सध्या या मतांमध्ये विभागणी होत असून शिंदे गट व मनसेसारखे पक्षही मराठी मतांचे वाटेकरी ठरत आहेत. यामध्ये मनसेचा वाटा विशेषतः मुंबई शहरात अधिक प्रभावी असल्याचेही या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. त्याशिवाय, भाजपकडूनही मराठी मतांना आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळेच ठाकरे गटांकडून मराठी आणि भाजपविरोधी मतांची फाटाफूट टाळण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 15, 2025 8:44 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Uddhav Thackeray Raj Thackeray : राजसोबत युती झाली तर कोणाची सत्ता? ठाकरे गटाच्या सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर