पंकजा मुंडेंना प्रश्न, त्यावर अजित पवार म्हणाले, EV कार घेतली का? जयंत पाटलांची तुफान फटकेबाजी, दादा अडचणीत!
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Ajit Pawar: अर्थसंकल्प जाहीर करून चार महिनेही उलटत नाहीत तोच ५७ हजार कोटींच्या पुरवण्या मागण्या सादर केल्याने अर्थमंत्री अजित पवार विरोधकांच्या निशाण्यावर आहेत.
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांवर चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना भिवंडी तालुक्यातील प्रस्तावित कचरा डेपोवरून प्रश्न विचारला असता, पर्यावरण विभागाला प्रश्न विचारण्याआधी तुम्ही प्रदूषणविरहित ईव्ही कार घेतली का? असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जयंतरावांना गमतीने विचारले. त्यावर जयंत पाटील यांनी जोरदार फटकेबाजी करून अजित पवार यांनाच अडचणीत आणले.
पावसाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ५७ हजार ५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर केल्या आहेत. अर्थसंकल्प जाहीर करून चार महिनेही उलटत नाहीत तोच ५७ हजार कोटींच्या पुरवण्या मागण्या सादर केल्याने अर्थमंत्री अजित पवार विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. याच पुरवणी मागण्यांवर चर्चा करण्यासाठी जयंत पाटील यांनी विधानसभेत भाषण केले. यावेळी जयंत पाटील यांनी पर्यावरणाच्या मुद्द्यावर मंत्री पंकजा मुंडे यांना विचारलेला प्रश्न आणि लगोलग अजित पवार यांची गमतीशीर मध्यस्थी, पुढे बरोबर कर्ज आणि व्याजावर गेल्याने शेवटी अर्थमंत्री म्हणून दादांनाच शांत राहण्यावाचून पर्याय उरला नाही.
advertisement
पंकजा मुंडे यांना प्रश्न, दादांची गमतीशीर एन्ट्री, जयंतरावांची फटकेबाजी
जयंत पाटील म्हणाले, मोकळा श्वास घेणे हा सर्वांचा अधिकार आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील मौजे अतकोली गावात ठाणे महापालिकेचा कचरा डेपो नेण्याचा घाट घातला आहे. परंतु त्याआधी शासनाने कायदेशीर बाबी तरी पूर्ण कराव्यात. ग्रामपंचायतीची परवानगी नाही, प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी नाही, पर्यावरण विभागाची परवानगी नाही, जिल्हा समितीची परवानगी नाही. ठाणे महापालिका हा प्रश्न रेटून पुढे नेत आहे, असा आरोप तेथील ग्रामस्थांचा आहे. ठाणे महापालिकेचा हा प्रश्न सुटला पाहिजे, यात दुमत नाही. पण कायदेशीर बाबींचे काय करणार? स्थानिक स्वराज्य संस्थाच जर बेकायदेशीरपणे काम करत असेल तर ते गंभीर आहे. पर्यावरण विभागाला डावलून महाराष्ट्रात कुणालाही कुठेही कचरा टाकता येणार नाही, अशी कोपरखळी जयंत पाटील यांनी पंकजा मुंडे यांना मारली. तशी भूमिका मंत्री म्हणून पंकजा मुंडे यांनी घेतली पाहिजे, अशी राजकीय फटकेबाजी जयंत पाटील यांनी केली. ठाणे महापालिकेचा प्रश्न म्हणून साहजिक जयंत पाटील यांचा रोख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे होता.
advertisement
अन् अर्थधोरणी अजित पवारांना शांत राहण्यावाचून पर्याय उरला नाही!
त्यावर सत्ताधारी बाकांवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, पर्यावरण विभागाला प्रश्न विचारण्याआधी तुम्ही प्रदूषणविरहित ईव्ही कार घेतली का, ते आधी सांगा... असे जयंत पाटील यांना विचारले. त्यावर हसत हसत जयंत पाटील यांनीही 'अर्थ धोरणी' अजित पवार यांना कोंडीत टाकणारे उत्तर दिले. अजितदादा आपण मला ईव्ही कार पाठवून द्या आणि ईव्ही कारसाठी सभागृहातील आमदारांना कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून द्या, असे जयंत पाटील म्हणाले. शासनाची अर्थस्थिती गंभीर असल्याची कबुली गेल्याच आठवड्यात अजित पवार यांनी दिली होती. त्याच पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी कारसाठी कर्ज उपलब्ध करून द्या, असे म्हणत दादांनाच खिंडीत गाठले. जयंत पाटील यांच्या प्रत्युत्तराने अजित पवार यांना शांत राहण्यावाचून पर्याय उरला नाही. जयंत पाटील यांच्या हजरजबाबी स्वभावाचा पुनर्प्रत्यय सभागृहाला आला.
advertisement
तो प्रकल्प रद्द करावा, जयंतरावांची विनंती
भिवंडी तालुक्यातून मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग जातोय. मुंबई बडोदरा महामार्ग जातोय. तो प्रगतीशील असणारा भाग आहे. तेथील कचरा डेपोला लोकांचा विरोध आहे. रोजगारावर कुऱ्हाड येईल. तेथील प्रकल्प रद्द करण्यासाठी लोकांचा पाठपुरावा सुरू आहे. लोकांच्या मागणीकडे सरकारने लक्ष द्यावे, अशी विनंती जयंत पाटील यांनी अखेर केली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 09, 2025 3:20 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पंकजा मुंडेंना प्रश्न, त्यावर अजित पवार म्हणाले, EV कार घेतली का? जयंत पाटलांची तुफान फटकेबाजी, दादा अडचणीत!