Wardha Crime : 12 वर्षीय मुलाला विहिरीला शेंदूर लावायला सांगितलं अन्..; वर्ध्यात महिलेकडून नरबळीचा प्रयत्न
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Wardha Crime : वर्धा जिल्ह्यातील नालवाडी परिसरात बारा वर्षीय मुलाला विहिरीत ढकलत त्याचा नरबळी देण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे.
वर्धा, (नरेंद्र मते, प्रतिनिधी) : नालवाडी परिसरात बारा वर्षीय मुलाला विहिरीत ढकलत महिलेकडून हत्येचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. जादुटोणासारख्या प्रकारातून महिलेने मुलाला विहिरीला शेंदूर लावायला सांगितलं. विहिरीला शेंदूर लावत असताना महिलेने मुलाला विहिरीत ढकलले. मुलाच्या धाडसाने प्रयत्न फसला. विहिरीतील दोराच्या सहाय्याने मुलगा विहिरीबाहेर आल्याने बचावला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात वेगवेगळया कलमान्वये आरोपी महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
शेजारी महिलेकडून बालकाचा नरबळी देण्याचा प्रयत्न
नालवाडीच्या नागसेन नगर येथे राहणाऱ्या शारदा राजू वरके हिने शेजारी खेळत असलेल्या बारा वर्षीय बालकाला बोलावून विहिरीजवळ नेले. विहिरीला शेंदूर लावायला सांगितले. वाकलेल्या बालकाला लगेच विहिरीत ढकलले. मुलगा विहिरीत असलेल्या दोरीच्या सहाय्याने कसाबसा चढत वर आला आणि आपले प्राण वाचवले. घरी पोहोचलेल्या बालकाने आई वडिलांना आपबीती सांगितली. आईच्या तक्रारीवरून आरोपी शारदा राजू वरके हिच्यावर खुनाच्या प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून नरबळी अघोरी प्रथा व जादूटोणा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
कायदा असूनही घटना घडतायेत
अंधश्रध्देपोटी अजूनही नरबळी देण्यासारख्या घटना सर्रासपणे दिसून येतात. आजही देशात नरबळीसारखे अनेक प्रकार अधूनमधून घडताना दिसून येतात. या विरोधात महाराष्ट्रात पहिल्यांदा कायदा करण्यात आला. महाराष्ट्राने अशा अमानवी कृतीला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष, अघोरी व दुष्कर्मी प्रथा आणि काळा जादू अधिनियम 2013' अशा प्रकारचा कायदा केला. असे करणारे महाराष्ट्र राज्य हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. डॉ. नरेंद्र दाभोळकर आणि त्यांच्या महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीने यासाठी मोठे कार्य केले आहे. मात्र, या कायद्यानंतरही अशा घटना घडत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या कायद्याची कडक अमलबजावणी करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
Location :
Wardha,Maharashtra
First Published :
Jan 24, 2024 9:48 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ वर्धा/
Wardha Crime : 12 वर्षीय मुलाला विहिरीला शेंदूर लावायला सांगितलं अन्..; वर्ध्यात महिलेकडून नरबळीचा प्रयत्न









